13 वर्षांचा लकी रात्री 11 वाजता घराबाहेर गेला तो परतलाच नाही, पोलिसांपुढे शोधण्याचे आव्हान

| Updated on: Aug 16, 2023 | 10:32 PM

लकी सकाळी घरी दिसला नाही. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना लकीची शोधाशोध सुरू केली. रात्री अकरा वाजता तो घराबाहेर पडल्याचे बाजूच्या महिलांनी सांगितले.

13 वर्षांचा लकी रात्री 11 वाजता घराबाहेर गेला तो परतलाच नाही, पोलिसांपुढे शोधण्याचे आव्हान
Follow us on

नागपूर : लकी (नाव बदललेलं) हा नरसाळा येथील १३ वर्षांचा मुलगा. आठव्या वर्गात शिकणारा. १५ ऑगस्ट असल्याने काल सुटी होती. लकी रात्री मोबाईल पाहत होता. आईने त्याला हटकले. याचा लकीला राग आला. रात्री आई-वडील आपल्या बेडरूममध्ये झोपले. बाजूच्या खोलीत लकी झोपला असेल, असे त्यांना वाटले. सकाळी उठून पाहतात तो त्यांना लकी दिसला नाही. त्यामुळे लकीचे आईवडील प्रचंड घाबरले. लकी हा त्यांचा एकुलता एक मुलगा. तीन वर्षांपूर्वी ४५ लाख रुपयांचे घर खरेदी केले. पण, कालच्या घटनेने ते हादरले.

रात्रीच्या कपड्यांवर घराबाहेर पडला

लकी सकाळी घरी दिसला नाही. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना लकीची शोधाशोध सुरू केली. रात्री अकरा वाजता तो घराबाहेर पडल्याचे बाजूच्या महिलांनी सांगितले. घराच्या गेटवरून उडी मारून लकीने पळ काढला. तो घरच्या शर्ट पँटवर होता. त्याच्याकडे पैसे नव्हते. शिवाय कपडेसुद्धा नवीन नव्हते. त्यामुळे तो रात्री कुठे गेला असेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

शोध घेतला पण, पत्ता नाही

लकीच्या आईवडिलांनी त्याची शोधाशोध केली. पण, तो काही सापडला नाही. नातेवाईकांना विचारले. शेजारीपाजारी माहिती घेतली. लकीच्या क्रिकेट खेळणाऱ्या मित्रांना विचारले. पण, लकीचा काही शोध लागला नाही. लकीच्या शाळेतील परिसरात चौकशी करण्यात आली. पण, आज शालेळा सुटी होती. अखेर लकीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली.

पोलिसांसमोर शोध घेण्याचे आव्हान

हुडकेश्वर पोलीस सध्या बंदोबस्तात व्यस्त आहेत. ताजाबाग येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. कारण येथे जुलूस भरतो. रोज हजारो भाविक येतात. लकी हरवला असल्याचं ताजाबाग येथे जाहीर करण्यात आले. पण, लकीचा शोध लागला नाही. आता तो कुठं गेला असेल, याचा शोध पोलीस घेत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे तपासून त्याचा शोध घेतला जाऊ शकतो. हुडकेश्वर पोलीस लकीच्या शोधासाठी काय करतात, हे पाहावं लागेल. लकीचे आईवडील मुलाच्या शोधासाठी वणवण भटकत आहेत. आता त्यांना आधार आहे पोलिसांचाच.