नागपुरात कोरोना संसर्ग वाढला, महाविद्यालयातील प्राचार्यासह 16 जणांना कोरोना

| Updated on: Feb 20, 2021 | 8:53 AM

पाटणसावंगी येथील महाविद्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथे प्राचार्यासह तब्बल 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. (nagpur student corona positive)

नागपुरात कोरोना संसर्ग वाढला, महाविद्यालयातील प्राचार्यासह 16 जणांना कोरोना
महाविद्यालय
Follow us on

नागपूर : राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून नागपुरातही कोरोना (Nagpur Corona) रुग्णांत वाढ होत आहे. जिल्ह्यातील पाटणसावंगी येथील महाविद्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथे प्राचार्यासह तब्बल 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे पुढील 10 दिवस हे महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. (16 student has been found corona positive in nagpur)

महाविद्यालयात 16 विद्यार्थ्यांना कोरोना

नागपुरातील कोरोनाचा रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपूर्वी आटोक्यात होती. मात्र येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा लक्षणीय वाढ झाल्याचे होत असल्याचे दिसून येत आहे. 19 फेब्रुवारी रोजी तब्बल 644 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे येथील प्रशासनाने खबरदारी म्हणून योग्य त्या उपायोजनांची अंमलबजावणी करणे सुरु केले आहे. तसेच वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागपुरात आता कोणत्याही कार्यक्रमासाठी आठ दिवस आधीच परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

पुढील 10 दिवस महाविद्यालय बंद

मात्र, एवढ्या साऱ्या उपायोजना करुनही येथील कोरोना संसर्ग थोपवण्यात म्हणावे तेवढे यश येत नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील पाटणसावंगी येथील एका महाविद्यालयात 16 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. सोबतच महाविद्यालयाच्या प्राचार्यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेमुळे येथे खळबळ उडाली असून खबरदारी म्हणून आगामी दहा दिवस महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांच्या संपर्कांतील इतर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तसेच, कोरोनाबधित विद्यार्थ्यांवर उपचार सुरु करण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, येथील प्रशासन दक्ष झाले आहे. कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करायचे असेल तर आठ दिवसांपूर्वी परवानगी घेण्याचे आदेश प्रशानाने दिले आहेत. तर दुसरीकडे रुग्ण वाढत असल्यामुळे नागपूर शहरात संचारबंदी लागू करण्याची मागणी होत आहे.

 

इतर बातम्या :

यवतमाळवर पुन्हा कोरोनाचं संकट, जिल्हाधिकारी रस्त्यावर, नव्याने निर्बंध लागू!