Cotton Damage : कपासीचे 2 लाख 48 हजार हेक्टर नुकसान, जुलैअखेरपर्यंतचे पंचनामे पूर्ण, नागपूर विभागात मदत केव्हा मिळणार?

| Updated on: Aug 19, 2022 | 5:15 PM

सर्वेक्षण करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. प्रसंगी गावातील मंदिर, मशिदी यावरील भोंग्यांद्वारे सर्वेक्षणाबाबत जनतेला माहिती द्यावी. त्यामुळे प्रत्येक शेताचा पंचनामा झाला याची खातरजमा होईल.

Cotton Damage : कपासीचे 2 लाख 48 हजार हेक्टर नुकसान, जुलैअखेरपर्यंतचे पंचनामे पूर्ण, नागपूर विभागात मदत केव्हा मिळणार?
कपासीचे 2 लाख 48 हजार हेक्टर नुकसान
Follow us on

नागपूर : नागपूर विभागात कपासीचे 2.48 लाख हेक्टर, सोयाबीनचे 1.26 लाख हेक्टर, तुरीचे 49 हजार हेक्टर, भाताचे 55 हजार हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. विभागात जुलै अखेरपर्यंतचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र, ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाचे पंचनामे (Panchnama) पुढील आठवड्यात पूर्ण होतील, असे कृषीमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सांगण्यात आले. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींकडून यावेळी आढावा घेतला. अनेक ठिकाणी शेतावर जाऊन सर्वेक्षण (Survey) झाले नाही. पंचनामे वस्तुनिष्ठ नाही, सरपंच व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नाही. रब्बीच्या नियोजनाबाबत गतीने काम करण्यात यावे. पशुधनाची (Livestock) मदत करताना पोस्टमार्टमसारख्या अटी ठेवू नये. 2020-21 मधील काही ठिकाणच्या मदती अद्याप प्राप्त नाहीत. शेतामध्ये पाणी साचले असल्यामुळे ड्रोनचे सर्वेक्षण ग्राह्य धरण्यात यावे. पीकविमा अधिकारी शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही. राष्ट्रीयीकृत बँकांनामार्फत शेतकऱ्यांना सहकार्य होत नाही, अशा तक्रारी यावेळी लोकप्रतिनिधींनी कृषीमंत्र्यांसमोर मांडल्या.

आमदारांनी मांडली गाऱ्हाणी

नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यामधील कोळसा खाणींमध्ये पाणी साचले. त्यामुळे शेतशिवाराचे झालेले नुकसान याबाबत या बैठकीत अनेक आमदारांनी गाऱ्हाणी मांडली. त्यासंदर्भात मदतीची मागणी अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना करावी. नुकसान भरपाई अहवाल सादर करावा, असे निर्देश कृषीमंत्री सत्तार यांनी दिले. राष्ट्रीयीकृत बँकांकडून अन्य बँकांच्या तुलनेत शेतकऱ्यांना कमी प्रमाणात कर्ज देण्यात आले. तसेच पीकविमा अधिकारी शेतकऱ्यांना उपलब्ध होत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही प्रश्नांवर जिल्हानिहाय आढावा घेण्याचे निर्देश कृषीमंत्र्यांनी दिले.

सर्वेक्षण करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे

सर्वेक्षण करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. प्रसंगी गावातील मंदिर, मशिदी यावरील भोंग्यांद्वारे सर्वेक्षणाबाबत जनतेला माहिती द्यावी. त्यामुळे प्रत्येक शेताचा पंचनामा झाला याची खातरजमा होईल. ज्याठिकाणी जाणे शक्य नसेल, पाणी साचले असेल त्याठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेवून सर्वेक्षण पूर्ण करावे. कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी कीड व्यवस्थापन, रब्बीचे नियोजन, पीकपॅटर्न यासाठी शास्त्रीय सल्ला द्यावा. सात दिवसांत अहवाल सादर करावा, असेही अब्दुल सत्तार यांनी सांगितले. नागपूर विभागाची प्रत्यक्ष परिस्थिती आपण आज बघणार आहो. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना याबाबत अवगत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

भंडारा, गडचिरोलीतील पूरपरिस्थिती गंभीर

भंडारा जिल्ह्यातील पूर परिस्थिती व गडचिरोली जिल्ह्यातील अनेक क्षेत्रात साचले असलेले पाणी याबाबत शासनाला माहिती आहे. गंभीरतेने शासन या दोन जिल्ह्याच्या परिस्थितीकडे लक्ष देवून असल्याचे कृषीमंत्री यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना रब्बीच्या नियोजनासाठी कृषी व पाटबंधारे विभागाने आतापासूनच नियोजन करण्याची सूचना दिली. खरीपात झालेले नुकसान रब्बीमध्ये भरुन निघेल. यासाठी पाणीपुरवठा, बियाणे पुरवठा व कृषीतज्ज्ञांकडून सल्ला घेण्याचे त्यांनी सांगितले.