Buldhana Bus Accident : काही संपूर्ण जळाले, तर काही अर्धवट, एकाही मृतदेहाची ओळख पटेना; अग्निशनम दलाचे जवानही हादरले

| Updated on: Jul 01, 2023 | 7:44 AM

बुलढाण्यात खासगी बस पलटल्याने या बसला भीषण आग लागली. या आगीत 25 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने 8 प्रवासी बचावले आहेत. बसचा जळून कोळसा झाला आहे. तर जळालेल्या मृतदेहांची ओळख पटणं मुश्किल झालं आहे.

Buldhana Bus Accident : काही संपूर्ण जळाले, तर काही अर्धवट, एकाही मृतदेहाची ओळख पटेना; अग्निशनम दलाचे जवानही हादरले
bus accident
Image Credit source: ani
Follow us on

बुलढाणा : नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा येथे डिव्हायडरवर आदळल्याने ही बस पलटी झाली. त्यानंतर या बसला भीषण आग लागली. या आगीत बसमधील 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर चालकासह आठ जणांचे प्राण वाचले आहेत. हे आठही जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपाचर सुरू आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. त्यामुळे सर्वच हादरून गेले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की मृतांची ओळखही पटणं मुश्किल झालं आहे.

विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती. नागपूरहून ही बस पुण्याकडे जायला निघाली होती. मध्यरात्री 1 ते 1.30च्या सुमारास समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा येथे बस डिव्हायडरला धडकली. त्यामुळे बस पलटी झाली. बस पलटी झाल्याने दरवाजाही तुटला. त्यामुळे प्रवाशांना दरवाजातून बाहेर पडणं मुश्किल झालं. तितक्यात बसने पेट घेतला. त्यामुळे सर्वच प्रवाशी हादरून गेले. प्रवाशांनी एकच टाहो फोडला. त्यातच आग लागल्याने प्रवाशांनी जीव वाचवण्यसााठी जीवाच्या आकांताने आक्रोश केला. पण त्यांना कुणीही वाचवू शकले नाही.

हे सुद्धा वाचा

जवान हादरले

अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी येऊन आग विझवली. त्यानतंर बसमधील दृश्य पाहून अग्निशमन दलाचे जवानही हादरून गेले. बसमध्ये 25 प्रवाशांचे मृतदेह पडलेले होते. सर्व मृतदेह जळालेले होते. अनेक मृतदेह अर्धवट अवस्थेत जळालेले होते. कुणाचाही मृतदेह ओळखता येत नव्हता. त्यानंतर जवानांनी एक एक मृतदेह बाहेर काढून त्यांच्यावर चादर टाकली. बस पलटी झाली तेव्हा चालक आणि काही प्रवाशांनी बसच्या खिडक्या फोडल्या आणि बसमधून बाहेर पडले. त्यामुळे एकूण 8 जणांचे प्राण वाचले आहेत. तर बाकीचे सर्व प्रवासी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

काहीच करू शकले नाही

आपल्यासमोरच बस पेटलेली असताना आणि प्रवासी होरपळून मरत असताना चालक आणि वाचलेले इतर प्रवासीही काहीच करू शकले नाहीत. कारण त्यांच्याकडे प्रवाशांना वाचवण्याची काहीच साधने नव्हती. त्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केलं. पण तोपर्यंत संपूर्ण खेळ संपलेला होता. अग्निशमन दलाने तात्काळ ही आग नियंत्रणात आणली. त्यानंतर बसमधून मृतदेह बाहेर काढले. रात्रीची वेळ असल्याने मदत कार्यात अडथळा येत होता.

फक्त कोळसा उरला

बसचा अक्षरश: जळून कोळसा झाला आहे. बसच्या सर्वच सीट जळून खाक झाल्या आहेत. प्रवाशांचे सामानही जळून खाक झाल्याने काहीच उरलेलं नाही. घटनास्थळी फक्त कोळसा आणि कोळसाच उरला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. मृतदेहांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांना कळवले जात आहे.