नागपूर : राज्याची उपराजधानी नागपुरात फेब्रुवारी महिन्यात एकही हत्येची घटना नाही. हा एक रेकॉर्ड ठरला. रक्तविरहीत फेब्रुवारीमुळं नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) कामगिरीची प्रशंसाही झाली. मात्र, हे कौतुक फार काळ टिकवता आले नाही. मार्च महिन्यात आतापर्यंत नऊ खुनाच्या घटना पुढं आल्याय. त्यामुळं या रक्तपाताने नागपूर हादरलं. गेल्या काही वर्षात नागपूर शहराची ओळख क्राइम सिटी (Crime City) अशी झालीय. सातत्याने खुनांच्या, घरफोडी, लुटीच्या घटनांनी नागपूर शहरात गुन्हेगारी वाढली. मात्र, दरम्यानच्या काळात नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Commissioner of Police Amitesh Kumar) यांनी शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली.
अनेक गुन्हेगारांवर मकोका, एमपीडीए आणि हद्दपारीची कारवाई केली. मात्र, तरीही हत्येच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. कौटुंबिक आणि व्यक्तीगत कारणांमुळे हत्या होत असल्यानं या घटना पोलीस रोखू शकत नसल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार सांगतात. नागपूर शहरात हत्येच्या घटनांचा आकडा साधारणतः शंभरपर्यंत जातो. सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे नागपूरकर दहशतीमध्ये असतात. गुन्हेगार कमी करण्यासोबतच शुल्लक कारणांवरून हत्तेपर्यंत जाणारी प्रवृत्ती कमी करण्याचं आव्हान पोलिसांनी स्वीकारावं. तरंच हत्येच्या घटनांचा आकडा कमी होऊ शकतो.
पाच मार्चला वाठोड्यात राजू चेलीकसवाई यांचा मित्रांनी मिळून खून केला. बारा मार्चला एमआयडीसी हद्दीत दूध विक्रेता विलास गवतेने पत्नी रंजना व मुलगी अमृताचा कोयत्याने गळा कापला. तेरा मार्चला नंदनवन झोपडपट्टीत शुभम नानोटेचा भाऊ व आईनेच गळा घोटला. पंधरा मार्चला कळमन्यात ऑटोचालक विक्रांत बनकरचा गळा कापण्यात आला. त्याच रात्री सोनू बन्सकरच्या डोक्यावर प्रहार करण्यात आला. बावीस मार्चला कोतवाली पोलीस हद्दीत मनीष यादवला गुन्हेगारांनी शस्त्राने भोसकले. तेवीस मार्चला रिंकू परासियावर अल्पवयीन साथीदारांनी डोक्यावर प्रहार केला. सत्तावीस मार्चला समर्थनगरात दीपा दासचा मृतदेह सापडला.