नागपूर : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पोलिसांना मारहाण केल्याची माहिती आहे. पोलिसांनी नितीश देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. देशमुख हे बाळापूर मतदारसंघाचे आमदार आहेत. याबाबत बोलताना नितीन देशमुख म्हणाले, ना पोलिसांसोबत माझ्याकडून मारहाण झाली. ना धक्काबुक्की झाली. फक्त शाब्दिक चर्चा झाली आणि संवाद झाला. मुळात या गोष्टी होणं आम्हाला अपेक्षित आहे. कारण गेल्या दोन महिन्यांपासून माझ्यावर हा दुसरा गुन्हा दाखल आहे. यापूर्वी भावना गवळी यांनीसुद्धा अश्लील चाळे करतो असा गुन्हा दाखल केला होता. इथंसुद्धा तशाच प्रकारचा सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल केला. मुळात तिथे उद्धव ठाकरेंनी बैठक आयोजित केली. त्या बैठकीसाठी मी निघालो होतो. तिथे शिवसेनेचे पदाधिकारी होते. त्यांना पोलिसांनी जाण्यास मनाई केली म्हणून मी त्या अधिकाऱ्यांना विनंती केल्याचं नितीन देशमुख यांनी सांगितलं.
मुळात मंत्र्यांच्या बंगल्यावर जायला पास लागण्याची गरज नाही. कारण जनतेने यांना निवडून दिलं. मुंबईमध्ये हा नियम नाही तर मग नागपूरलाच का असा प्रश्न आहे. आम जनतेला तिथे जाता यायलाच पाहिजे. मुळात तो नियम अधिकृत आहे का असा प्रश्न असल्याचंही नितीन देशमुख म्हणाले.
निश्चितपणे आमच्यावर कारवाई होईल, हे आम्हाला अपेक्षितच आहे. पाच सहा महिने जेलमध्ये जावं लागलं तरी त्यासाठी आमची तयारी आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्मसुद्धा जेलमध्येच झाला होता. महात्मा गांधीसुद्धा जेलमध्ये गेले. असे गुन्हे दाखल झाले म्हणजे आम्ही क्रिमिनल आहो असं नाही, असंही नितीन देशमुख यांनी स्पष्ट केलं.
सर्वसामान्य नागरिक पोलीस स्टेशनला रिपोर्ट घेऊन जातो. तेव्हा घटना किती वाजता घडली हे त्याला विचारलं जातं. मात्र ही घटना सहा वाजता घडली असताना रिपोर्ट अकरा वाजता दिली. त्यामुळे या पाच घंट्यात त्यांची मानसिकता काय झाली की, त्यांच्यावर दडपण आणलं हे सुद्धा पाहावं लागणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं. आम्ही मानसिकता तयारच करून ठेवली की अशा घटना आमच्या सोबत होणारच आहेत. आम्ही पोलिसांचा मान राखतो आणि तो राखू. ते आपलं काम करत असतात. त्यांच्यावर दबाव असेल म्हणून त्यांनी हे केलं असावं, असा आरोप नितीन देशमुख यांनी केला.
संबंधित अधिकाऱ्यांवर काहीतरी मानसिक दडपण आणण्यात आलं असावं असं मला वाटतं. मात्र अशा अधिकाऱ्यांनी दडपणात राहू नये. सत्ता येते आणि सत्ता जाते. अशा चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. असे अधिकारी कायमस्वरूपी स्मरणात राहतात, असं आमदार नितीन देशमुख यांनी सांगितलं.