नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून आता उद्धव ठाकरे यांनी हाऊसमध्ये येऊन सरकारला घेरलं. सत्तांतरानंतर पहिल्यांदाचं उद्धव ठाकरे विधान परिषदेत आले. मुख्यमंत्री शिंदे यांना टोले लगावले. सर्वोच्च न्यायालयात निर्णय लागेपर्यंत कर्नाटकव्याप्त भाग हा केंद्रशासित झालाचं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री जोरात बोलतात. पण, आमच्या मुख्यमंत्र्यांनी यावर एक ब्र तरी काढला का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना सवाल केला होता. मी लाठ्या खाल्ल्या तेव्हा प्रश्न विचारणारे कुठं होते, असं शिंदे म्हणाले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय. तुम्ही लाठ्या खाल्या तेव्हा आमच्या पक्षात होता. आता सीमा पार करून दुसरीकडं गेलात. तेव्हा लाठ्या खाल्या म्हणजे आता गप्प बसणं असं त्याचा अर्थ होत नाहीय.
कर्नाटकचे मुख्यमंत्री डिवचत असताना आपण गप्प का, असा सवाल अजित पवार यांनी केला. आपल्या अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आपणही जशास तसं उत्तर दिलं पाहिजे.
त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले,आपण हा ठराव उद्या निश्चितपणे घेऊ. या प्रकरणात महाराष्ट्राचं सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हे मी या सभागृहाला आश्वस्त करतो.
भास्कर जाधवांना सभागृहात बोलू दिलं. यावेळी त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला लावेल, अशी कुणाच्या बापात हिंमत नाही.