नागपूर : तारुण्यात आकर्षण म्हणून वाहावत गेलेल्या युवकांची परिस्थिती खूपच गंभीर होते. असाच एक प्रकार कळमन्यात उघडकीस आला. अल्पवयीन मुलीला एका युवकाने फूस लावून पळविली. नंतर तिला खूपच वाईट दिवस काढावे लागले. इकडं आईवडिलांनी पोलिसांत मुलगी हरविल्याची तक्रार दिली. तपासात ती परराज्यात असल्याचे समजले. तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होती. त्याने तिला धोका दिल्याचे लक्षात आले. मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सोपविण्यात आले असून, आरोपीला बेळ्या ठोकल्या.
कळमन्यात राहणारी सोळा वर्षांची मुलगी प्रियकरासोबत बेपत्ता झाली. चिंतातूर आई-वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तिचा दोन वर्षांनी शोध लावला. त्या मुलीला एका वर्षाच्या बाळासह पोलिसांनी ताब्यात घेतले तर प्रियकराला अटक केली. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या (एएचटीयू) सकारात्मक भूमिकेमुळे वृद्ध आई-वडिलांना मुलगी परत मिळाली. वसीम खान कय्युम खान असे आरोपीचे नाव आहे.
दोन एप्रिल २०१९ रोजी आरोपी वसीम खानने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. याप्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कळमना पोलिसांनी मुलगी आणि आरोपीचा शोध घेतला. दोघेही सापडले नाही. त्यानंतर हा तपास गुन्हे शाखेच्या एएचटीयूकडे देण्यात आला.
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक रेखा संपकाळ आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक पद्धतीने तपास केला. तपासात संशयित आरोपीच्या राहत्या ठिकाणी शोध घेतला असता दोघेही सापडले नाही. त्यानंतर मुलगी ही उत्तर प्रदेशातील कोसंबी जिल्ह्यातील नंदसैनी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचे एक पथक कोसंबीला गेले. पोलिसांनी वसीमच्या घरी त्याचा शोध घेतला.