नागपूर : काही कंपन्या पार्ट्या आयोजित करतात. या पार्ट्यांमध्ये मस्त एंजायमेंट असते. यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जातात. डीलर्सला खूश करण्यासाठी या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. त्यात अश्लील डान्स आयोजित केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. या डान्सच्या व्हायरल व्हिडीओने उमरेड येथे काही दिवसांपूर्वी घडलेली घटना डोळ्यासमोर आली. त्यावेळी भंडाऱ्यातील काही प्रतिष्ठित लोकं डान्स करणाऱ्या मुलींसोबत सापडले होते. त्यावेळी संबंधितांवर कारवाई करण्यात आली होती. आता नागपुरात दुसरं प्रकरण उघडकीस आलं आहे.
शहराच्या वेशीवर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये कॉर्पोरेट कंपनीच्या डीलर्स मिट आणि प्रॉडक्ट्स लाँचिंगदरम्यान पार्टी आयोजित करण्यात आली. या पार्टीमध्ये अश्लील डान्सवर पैश्याची उधळण केल्या प्रकरणात बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कॉर्पोरेट कंपनीच्या इव्हेंट मॅनेजर तसेच हॉटेलच्या सेल्स मॅनेजरसह अन्य एक अश्या तीन लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांनी दिली आहे.
नागपूरच्या वर्धा रोडवरील बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी ही घटना घडली. कार्पोरेट कंपनीच्या डीलर्ससाठी या पार्टीचं आयोजन करण्यात आले होते. हा सगळा धक्कादायक प्रकार सोशल माध्यमांवर व्हीडिओ व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. करार झालेली कागदपत्र तपासून तीन जणांवर गुन्हा दाखल केला.
डीलर्स कंपनीला फायदा कमवून देतात. त्यामुळे त्यांना खूश करणे आवश्यक असते. त्यासाठी कंपनी अशाप्रकारचे आयोजन करते. डीलर्सला खूश करण्यासाठी काहीपण असं हे प्रकरण घडलं. समाजात अश्लीलता पसरवण्याचा प्रयत्न यामुळे झालेला दिसतो.