नागपूर : केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक युनिटने (एसीबी) केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे (सीजीएसटी) (Central Goods and Services Tax Department) सहआयुक्त व चार्टर्ड अकाउंटंट यांना चार लाख रुपयांची लाच घेताना अटक केली. यवतमाळचे जयंत चौपाणे या कंत्राटदाराला चार लाखांची लाच मागितली होती. सीजीएसटीचे सहआयुक्त मुकुल पाटील (Joint Commissioner Mukul Patil) आणि सीए हेमंत राजंडेकर असं अटक झालेल्या आरोपींची नावं आहेत. सेवा कर दायित्वाशी संबंधित प्रकरणात लाच मागितली होती. कंत्राटदाराला सेवा कर दायित्वाशी संबंधित कारणे दाखवा नोटीस (Show cause notice) बजावण्यात आली होती. मुकुल पाटील यांनी हेमंत राजंडेकर यांच्या माध्यमातून लाचेची मागणी केली होती. आरोपी पाटील यांना दोन महिन्यांपूर्वीच पदोन्नती मिळाली होती. त्यांच्याकडे सीजीएसटीमध्ये कस्टम विभागात जबाबदारी सोपविण्यात आली होती.
यवतमाळ येथील जय इलेक्ट्रिल्सचे ठेकेदार जयंत चौपाणे यांचे प्रकरण पाटील यांच्याकडे सुनावणीसाठी होते. या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी सीए हेमंत राजंदेकर यांच्या माध्यमातून चार लाख रुपये देण्याचे निश्चित झाले. ठेकेदार जयंत चौपाणे गुरुवारी सायंकाळी अजनी चौकातील सीएच्या कार्यालयात पोहोचला. सीएने चार लाख रुपये लाच घेतली. तसेच याची माहिती मुकुल पाटील याला दिली. यानंतर सीबीआयच्या पथकाने राजंदेकरला ताब्यात घेतले.
सीबीआयचे पथक राजंदेकरला घेऊन सिव्हिल लाईन येथील जीएसटी कार्यालयात पोहोचले. अतिरिक्त मुकुल पाटील याला अटक करण्यात आली. जीएसटी नागपूर कार्यालयात सुपर क्लास वन श्रेणीतील अधिकार्याला अटक झाली. त्यानंतर त्याच्या निवासस्थानीही झडती घेण्यात आली. पाटील तीन वर्षापूर्वी गुजरात येथून बदली होऊन नागपुरात आला होता. दोन्ही आरोपींना शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयात सादर केले जाईल. सीबीआयचे अधीक्षक एम. एस. खान यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.