राज्यात पाच वर्षांत ११५ वाघांचा मृत्यू, माहिती अधिकारात धक्कादायक माहिती उघड

| Updated on: Jul 28, 2023 | 5:38 PM

पिकांच्या नुकसानीला त्रासून काही शेतकरी विजेच्या प्रवाहाचा धोकादायक मार्ग निवडतात, ही वस्तुस्थिती आहे. फक्त नियम तयार करून होत नाही. त्या नियमांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे.

राज्यात पाच वर्षांत ११५ वाघांचा मृत्यू, माहिती अधिकारात धक्कादायक माहिती उघड
Follow us on

नागपूर : विदर्भात राखीव अभयारण्य आहेत. या जंगलात वाघांची मोठी संख्या आहे. त्यामुळे नागपूरला टायगर कॅपिटल म्हटले जाते. पण, वाघांच्या मृत्यूची धक्कादायक माहिती माहिती अधिकारात समोर आली आहे. शेतात लावण्यात येणाऱ्या विजेच्या प्रवाहाने दहा वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांवर अशी वेळ का येते, याचा वनविभागाने विचार करण्याची गरज आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतीचे अतोनात नुकसान होते. त्यामुळे जंगलाशेजारील गावातील शेतकरी वन्यप्राण्यांमुळे पुरते वैतागले आहेत. वनविभागाने प्राणी गावात शिरू नये, म्हणून फेंसिंग टाकणे अपेरक्षित आहे. पण, अद्याप बऱ्याच ठिकाणचे प्रस्ताव धुळखात पडले आहेत. त्यामुळे पिकांच्या नुकसानीला त्रासून काही शेतकरी विजेच्या प्रवाहाचा धोकादायक मार्ग निवडतात, ही वस्तुस्थिती आहे. फक्त नियम तयार करून होत नाही. त्या नियमांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे. ती होताना दिसत नाही. त्यामुळे जंगलाशेजारील लोकं वनकर्मचाऱ्यांविरोधात नेहमी दोन हात करण्यास तयार असतात.

महाराष्ट्रात 2018 ते 2022 या पाच वर्षात तब्बल 115 वाघांचा विविध कारणाने मृत्यू झाला आहे. यात 24 वाघांचा मृत्यू शिकारीमुळे झाला आहे. त्यामुळे शिकार रोखण्यासाठी वन विभागाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न पूर्णपणे अपयशी झाल्याचं स्पष्ट होत आहे. आरटीआय अंतर्गत हे माहिती समोर आली आहे.


२४ वाघांची शिकार

वाघांच्या संवर्धनासाठी वन विभागाकडून अनेक प्रकारचे उपक्रम राबवण्यात येत आहे. वनविभागाच्या प्रयत्नामुळे वाघांच्या संख्येत वाढ देखील झाली आहे. मात्र एकीकडे वाघांची संख्या वाढत असताना वाघांचे मृत्यू देखील होत आहेत. 2018 ते 2022 या पाच वर्षाच्या कालावधीत राज्यात 115 वाघांचा विविध कारणामुळे मृत्यू झाला आहे. तर, 24 वाघांची शिकार करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागितलेल्या माहितीत वन विभागाने हे आकडे दिले आहेत. 2018 ते 2022 वाघांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणाने झाला. नैसर्गिक मृत्यू – 67, शिकार – 24, अपघात – 14, विद्युत प्रवाहामुळे – 10 मृत्यू झाले.

जंगलातून जाणारे महामार्गही वाघांसाठी आता धोकादायक ठरत आहेत. 14 वाघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. शेतात लावण्यात येणारे विद्युत प्रवाह वाघाच्या जिवावर उठले. दहा वाघांचा मृत्यू विद्युत प्रवाहामुळे झाला आहे. वाघांचे सर्वाधिक 32 मृत्यू हे 2021 मध्ये झाले आहेत. व्याघ्र संवर्धनासाठी वनविभागाकडून अनेक प्रयत्न करण्यात येतात. मात्र हे प्रयत्न अपुरे ठरत असल्याचं यातून दिसून येतय. असं माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोल्हारकर यांनी सांगितलं.