नागपूर : जिल्ह्यातील खापरखेडा औष्णिक केंद्रामुळे होणाऱ्या प्रदूषणाची पाहणी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे केली. त्यानंतर आता महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला जाग आलीय. वीजनिर्मिती केंद्रातील राखेची कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यासाठी चार मुद्यांवर वीस लाख रुपयांची बँक हमी (Bank Guarantee) जमा करण्याचे निर्देश दिलेत. त्यासोबतच निर्देशांचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दिलाय. नांदगाव तलावात साचलेली राख काढून, या तलावाचे पुनरुज्जीवन करावे. हे पुनरुज्जीवन करताना येत्या पंधरा दिवसांत जमिनीचा मूळ पोत यायला हवा. या राखेचा पर्यावरणपूरक वापर करावा. वाहतुकीदरम्यान त्याचे उत्सर्जन टाळण्यासाठी राखेवर आच्छादन असावे. तलावाचे पुनरुज्जीवन तसेच त्याच्या पर्यावरणपूरक (Environmentally Friendly) वापराबाबत प्रत्येक आठवड्याला त्याचा अहवाल मंडळाकडे पाठवावा. या मुद्यांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी पाच लाख रुपयाची बँक हमी जमा करावी. असे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने (Pollution Control Board) दिलेत. या चारही निर्देशांचे पालन न झाल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मंडळाचे विभागीय अधिकारी ए. एम. कारे यांनी खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंत्याला दिलाय.
बैठकीत आदित्य ठाकरे म्हणाले होते की, प्रदूषण रोखण्यासाठी नांदगाव तलावात राख टाकणे कायमचे बंद केले जाईल. ही राख वाहून आणणारी पाईपलाईन काढून टाकण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच सध्या टाकण्यात आलेली राखही तातडीने उचलण्यात येईल. केंद्र सरकारच्या नियमांनुसार शंभर टक्के फ्लाय अॅशचा वापर रस्ते बांधकामासह इतर पायाभूत प्रकल्पांसाठी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. याबाबत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि महाजेनकोची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल. विकास कामांसोबतच पर्यावरणाचे संरक्षण सुद्धा महत्वाचे आहे. यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे श्री. ठाकरे यांनी फ्लाय ॲश पाँडच्या पाहणीप्रसंगी सांगितले होते.
नांदगावमधील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे शुद्धीकरण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. तसेच या परिसरातील कोळसा वाहतूक बंदिस्त वाहनातूनच होईल, याची दक्षता घ्यावी. नांदगाव तलावासाठी जमिनी अधिग्रहित केलेल्या प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत. त्यासाठी आराखडा तयार करावा. बचतगटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जावा, असे श्री. ठाकरे नुकत्याच घेतलेल्या बैठकीत म्हणाले होते.