नागपूर : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे मीडियासमोर बोलताना थुंकले. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संजय राऊत यांना कानपिचक्या दिल्या. त्यामुळे राऊत आणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपली आहे. धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं बरं असं राऊत म्हणाले. तर राऊत काहीही बोलल्याने आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत, असं अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. अजित पवार हे मीडियाशी बोलत होते. आता त्यावर राऊत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संजय राऊत यांच्या विधानाबाबत राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर आधी त्यांनी नो कमेंट्स म्हणत बोलण्यास नकार दिला. मात्र, नंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या बोलण्याने आमच्या अंगाला काही भोकं पडत नाहीत. ती मोठी माणसं आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. ही आपली संस्कृती नाहीये. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. तो त्यांचा अधिकार आहे. मला त्याबद्दल बोलायचंच नाही, असं अजित पवार म्हणाले.
धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं कधीही चांगलं. संयम राखणं ही चांगली गोष्ट आहे. आम्ही त्याचा आदरच करतो. पण ज्याचं जळतं, त्यालाच कळतं. आम्ही भोगतो आहोत, अशा खोचक शब्दात राऊत यांनी टीका करतानाच संतापही व्यक्त केला. तसेच अजितदादांच्या भाजपसोबत जाण्याबाबतच्या भूमिकेवरही टीका केली. एवढं सर्व भोगूनही आम्ही आमच्याच पक्षात आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा विचारही शिवत नाही. संकट आलं म्हणून भाजपसोबत जाण्याचा विचारही आमच्या मनातयेत नाही, असा टोलाही त्यांनी अजित पवार यांना लगावला.
त्यापूर्वी अजित पवार यांनी राऊत यांना कानपिचक्या दिल्या होत्या. नेत्यांनी महाराष्ट्राची संस्कृती, परंपरेचं पालन करायला पाहिजे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो. ते उभ्या देशाला दाखवून दिलंय. प्रत्येकांनी तारतम्य ठेऊन वागावं, असा टोला अजित पवार यांनी लगावला होता. तसेच मला दुसरी बाजू एकायला मिळाली. त्यात संजय राऊत यांनी म्हटलं काही त्रास होता त्यामुळे ते केलं. माझा थुकण्याचा उद्देश नव्हता असं त्यांनी सांगितलंय, असंही अजित पवार म्हणाले होते.