नागपूर: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे स्पेशल विमानाने मुंबईत येणार आहेत. विशेष म्हणजे सरकारी विमानाने अजितदादा मुंबईत येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच त्यांना हे विमान उपलब्ध करून देणार आहेत. खुद्द अजित पवार यांनीच ही माहिती दिली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विरोधक सत्ताधाऱ्यांच्या प्रेमातही पडल्याची टीका विरोधकांवर होत आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जामिनावर सुटका झाली आहे. परंतु त्यांना मुंबईबाहेर जाण्यास कोर्टाने मज्जाव केला आहे. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आणि राष्ट्रवादीशी संबंधित कामांसाठी अजित पवार मुंबईत येणार आहेत. मुंबईत काही तासांसाठी आल्यानंतर पुन्हा ते नागपूरला रवाना होणार आहेत.
त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादांसाठी सरकारी विमानाची व्यवस्था केली आहे. अजितदादांसोबत दिलीप वळसेपाटील मुंबईला जाणार आहेत. अजितदादांनी पत्रकारांशी संवाद साधताना तशी माहिती दिली आहे.
मला मिळालेल्या माहितीनुसार विद्यमान आमदार अनिल देशमुख यांना जामीन मिळाला आहे. पण त्यांना मुंबईबाहेर जाता येणार नाही. त्यामुळे जयंत पाटील यांना सांगलीतून मुंबईला जाण्यास सांगितलं आहे. मीही मुंबईला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल माझ्यासोबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीबाबत चर्चा केली. त्यावेळी मी उद्या नसेल परवा मिटिंग घ्या असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं.
त्यावर मुख्यमंत्र्यांनी कारण विचारलं. तेव्हा मुंबईला जायचं असल्याचं मी त्यांना सांगितलं. तेव्हा सकाळी 10 वाजता बैठक घेऊ. त्यानंतर तुम्ही जा. तुम्हाला मुंबईला जाण्यासाठी सरकारी विमान देतो असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यानुसार मी माझ्या कार्यक्रमात बदल केला आहे. आज दुपारी 1 वाजता मी मुंबईला जाणार आहे. माझ्यासोबत दिलीप वळसे पाटील असतील, असं अजित पवार म्हणाले.
मलाही कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे. कधी काही प्रसंग आले तर आम्ही एकमेकांना सहकार्य करायचो. कदाचित मी दुपारी 1 वाजता सरकारी विमानाने मुंबईला जाईल. तसेच त्याच विमानाने परत येण्याचं माझं नियोजन असणार आहे, असं ते म्हणाले.
मी काल अनिल देशमुखांच्या वकिलांशी बोललो. त्यांना अधिवेशनाची माहिती दिली. ते काटोलचे आमदार आहेत. ते अधिवेशनापासून वंचित होते. वकिलाने कोर्टात माहिती द्यावी. त्यानंतर हा अधिकार कोर्टाचा असतो. कोर्टाच्या परवानगी शिवाय मुंबईबाहेर जाता येणार नाही. सर्वांनी आदेशाचं पालन करायचं असतं, असंही ते म्हणाले.
अधिवेशनाचा कालावधी तीन आठवड्यांचा केला जावा अशी आमची मागणी आहे. विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. दोन वर्षानंतर नागपुरात अधिवेशन होत आहे. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवला जावा, अशी मागणी त्यांनी केली.
उदय सामंत यांच्या डिग्रीवरही त्यांनी भाष्य केलं. तुम्हाला आमदार, मंत्री होण्यासाठी जे काही कायदे आणि नियम आहेत ते बघितले पाहिजे. डिग्री बोगस आहे की काय याला काही अर्थ नाही. मागेही मंत्र्यांवर असेच आरोप झाले. काहींच्या शिक्षण संस्था असल्यामुळे त्यांना डॉक्टरेट मिळतात. अशांना काय बोलायचं? असा चिमटाही त्यांनी काढला.
काही लोकांनी संस्था काढली. विद्यापीठ काढलं ते नक्कीच हुशार असतात. काही लोकांना चांगलं काम मिळाल्याबद्दल डॉक्टरेट मिळते. काहींकडे डिग्री असते. पण ते परीक्षेला बसलेलेच नसतात. जे काही शिक्षण घेतलं ते लिहावं. त्यात काही कमीपणा वाटण्याचं कारण नाही.
दहा डिग्री असणारे कसं काम करतात आणि कमी शिकलेले कसे काम करतात हे सर्वांनी पाहिलं आहे. वसंतदादा पाटील चौथी शिकलेले होते. पण तडफेने काम करायचे. त्यामुळे डिग्रीला किती महत्त्व द्यायचं हे पाहिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.