डोळ्याच्या आजाराने नागरिक त्रस्त, अशी आहेत लक्षणं, मनपाचे काळजी घेण्याचे आवाहन

| Updated on: Jul 25, 2023 | 7:21 PM

कंजंक्टिवायटिस हा संसर्ग सुक्ष्म जीवाणूंमुळे होतो. डोळ्यांची साथ होणारे रुग्ण सापडत आहेत.

डोळ्याच्या आजाराने नागरिक त्रस्त, अशी आहेत लक्षणं, मनपाचे काळजी घेण्याचे आवाहन
Follow us on

नागपूर : पावसामुळे वातावरणात सुक्ष्म बदल होतात. बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे आजाराची शक्यता बळावते. नागपूर शहरात कंजंक्टिवायटिस (नेत्रश्लेष्मला) हा डोळ्यांचा आजार झाला. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन नागपूर महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. कंजंक्टिवायटिस हा संसर्ग सुक्ष्म जीवाणूंमुळे होतो. डोळ्यांची साथ होणारे रुग्ण सापडत आहेत.

कंजंक्टिवायटिस हा डोळ्यांच्या संसर्गामुळे पांढऱ्या भागावरती आणि पापणीच्या आतल्या बाजूस दाह संसर्गामुळे होतो. आजवर या आजाराच्या 380 पेक्षा अधिक रुग्णाची नोंद नागपूर महानगरपालिका आरोग्य केंद्रात झाली आहे. त्यामुळे याबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन मनपाच्या नोडल (साथरोग) वैद्यकीय अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी केले आहे.

हा आजार प्रामुख्याने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज पसरू शकतो. पण योग्य वेळेला निदान झाल्यास काही चिंता नाही. हा आजार फक्त शरीर संपर्काद्वारे आणि स्त्राव संपर्काद्वारे पसरू शकतो. कंजंक्टिवायटिस संबंधित काही लक्षणं दिसल्यास वेळीच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. महापालिका आरोग्य केंद्रात जाऊन उपचार करावेत, असेही आवाहन डॉ. गोवर्धन नवखरे यांनी केले आहे.

अशी आहेत लक्षणे

– कंजंक्टिवा (नेत्रश्लेष्मला) वरती सुज येणे

– डोळ्याचा पांढरा भाग किंवा पापणीच्या आतील भाग लाल होणे

– डोळ्याची आग होणे आणि खाज सुटणे

– धुसर दृष्टी आणि प्रकाश प्रती संवेदनशीलता

– डोळ्यातून स्त्राव येणे

प्रतिबंधात्मक उपाय

– स्वच्छता राखणे : नियमितपणे हात धुवावे आणि डोळ्यांना सारखा हात लावणे टाळावे

– टॉवेल किंवा रुमाल : ऐकमेकांचा वापरु नये

– उशीची खोर नियमितपणे बदलवावी

– डोळ्यांची सौंदर्य प्रसाधने किंवा डोळ्यांची काळजी घेणाऱ्या वस्तू एकमेकांच्या वापरू नये

 

कंजंक्टिवायटिस झाल्यास अशी घ्या काळजी

संपूर्ण विलगीकरणासह घरी राहून विश्रांती घ्यावी, ज्यामुळे आजाराचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकेल

– टॉवेल किंवा रुमाल कुणालाही वापरायला देऊ नये

– आपले कपडे वेगळे धुतले जातील याची काळजी घ्यावी

– लक्षणे दिसून आल्यास स्वत:च्या मनाने औषध घेऊ नये वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

– संसर्ग जाईपर्यंतत दररोज उशीची खोर बदलवावी

– संसर्ग झालेला डोळा बोटाने चोळू नये. आवश्यक असल्यास टिशुचा वापर करावा

– डोळ्यात धूळ किंवा काही जाण्यापासून जपावे, अन्यथा त्रास वाढू शकतो