नागपूर : कारागृहातील सिध्ददोष बंदिवानांच्या किशोरवयीन मुलांसाठी प्रत्यक्ष ‘गळाभेट’ कार्यक्रमाचे आज मध्यवर्ती कारागृह येथे आयोजन करण्यात आले होते. किशोरवयीन मुला-मुलींनी आपापल्या पालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या मनातील भावनांना (An emotional bond) व्यक्त करत हितगुज केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 120 बंदिवानांच्या 189 पाल्यांची आप्तेष्ठांशी प्रत्यक्षरीत्या भेट घडवून आणण्यात आली. 1 सप्टेंबर रोजी कारागृह ध्वजदिनाचे (Flag Day) आयोजन करण्यात येते. त्यानिमित्त कारागृह विभागाव्दारे राज्यात सर्वत्र बंदीवानांच्या पाल्यांना प्रत्यक्ष गटण्याच्या ‘गळाभेट’ हा अभिनव उपक्रम आज नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Central Jail) घेण्यात आला.
कारागृह उपमहानिरीक्षक श्रीमती स्मिता साठे, कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी देवराव हाडे, वामन निमजे, तुरुंगाधिकारी दीपक भोसले, माया धतुरे यांच्यासह कारागृहाचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 1 सप्टेंबर 1969 रोजी कारागृह विभागास ध्वज प्रदान केला होता. त्यादिवसापासून प्रथमत:च राज्यात सर्वत्र कारागृह विभागाचा ध्वजदिन साजरा करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात कित्येक मुलामुलींना त्यांच्या पालकांशी भेटता आले नव्हते. मात्र, यंदा कारागृह विभागाच्या या अभिनव उपक्रमामुळे अनेकांना त्यांच्या पालकांशी भेटता आले.
या प्रत्यक्ष भेटीचा आनंद लहान मुलामुलींच्या चेहऱ्यावर दिसून आला. बंदिवानांनी आपापल्या मुलामुलींचे शिक्षण, आरोग्य, पैसाअडका व राजीखुशी संदर्भात हितगुज यावेळी केले. कारागृह ध्वजदिनानिमित्त आज मध्यवर्ती कारागृहाच्या प्रांगणात सकाळी 7.45 वाजता कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बंदिवानांचं जीवन अतिशय खडतर असते. कुटुंबाशिवाय त्यांना जगावं लागते. अशावेळी बायको, मुलं-मुली यांची त्यांना आठवण येते. त्यांना भेटता यावं, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. बऱ्याच दिवसांपासून आपल्या कुटुंब प्रमुखाला भेटता आल्यानं मुलं-महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.