नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक वर्ष एक महिना आणि 27 दिवस तुरुंगात काढावी लागली. या दरम्यान त्यांच्या मालमत्तेवरही टाच आली. त्यांच्या घरावर अनेकवेळा छापेमारी झाली. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली होती. देशमुख यांचं राजकारण संपलंय असं सांगितलं जात होतं. नागपुरात देशमुख यांचे आता पूर्वीसारखे वर्चस्व राहणार नसल्याचंही सांगितलं जात होतं. पण देशमुख यांनी सर्व कयास फोल ठरवले आहेत. नागपुरात अजूनही आपलीच चलती असून लोकांचा आजही आपल्यावर विश्वास असल्याचं देशमुख यांनी दाखवून दिलं आहे. नरखेड खरेदी विक्रीच्या निवडणुकीतून देशमुख यांनी हे दाखवून दिलं आहे.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुखांची यांनी आपल्या मतदारसंघातील पहिली निवडणूक जिंकलीय. नागपूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नरखेड खरेदी विक्रीच्या निवडणुकीत अनिल देशमुख यांच्या पॅनलचा मोठा विजय झाला आहे. विशेष म्हणजे तब्बल 46 वर्षांनंतर सहकार क्षेत्रातील ही निवडणूक झाली. या निवडणूकीत अनिल देशमुख यांच्या पॅनलविरोधात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी फुटीर गट, काँग्रेसचं पॅनल होतं. पण तरीही अनिल देशमुख यांच्या पॅनलने व्यवस्थित रणनीती आखून आपलं वचर्स्व निर्माण केलं आहे.
या निवडणुकीत अनिल देशमुख यांच्या पॅनलचे 11 पैकी 8 सदस्य विजयी झाले आहेत. या निवडणूक निकालावर अनिल देशमुख यांनी समाधान व्यक्त केलं आहे. हा एकजुटीचा विजय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सर्वचजण आमच्या विरोधात एकवटले होते. पण मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि नरखेड खरेदी विक्रीची सत्ता आमच्या हातात दिली आहे. आता आम्ही चांगलं काम करून दाखवण्यावर भर देणार आहोत, असं अनिल देशमुख म्हणाले.
नरखेड तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्विवाद यश मिळवले आहे. या सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि मतदार बंधू भगिणींचे मन:पूर्वक आभार. या विजयासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांचे देखील आभार! आपण सगळे एकजुटीने शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहूया, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.
अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर गंभीर आरो केले होते. देशमुख यांनी 100 कोटीच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ईडी आणि सीबीआयकडून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या घरी आणि कार्यालयावर अनेक वेळा छापेमारी करण्यात आली होती. त्यांची मालमत्ताही जप्त करण्यात आली होती.
त्यानंतर अखेर 14 महिन्यानंतर देशमुख यांना जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यावर त्यांना मुंबई सोडून कुठेही न जाण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे देशमुख काही काळ मुंबईतच होते. नंतर ते कोर्टाच्या परवानगीने नागपूरलाही गेले होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर देशमुख यांनी सक्रिय राजकारणात भाग घेतला. त्याचाच एक भाग म्हणून नरखेडच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलने घवघवीत यश मिळवलं आहे.