महाराष्ट्रातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर अवकाळीनंतर अजून एक संकट उभे ठाकले आहे. नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन होते. बांगलादेशमधून त्याला मोठी मागणी आहे. संत्रा उत्पादक गेल्या वर्षीपर्यंत दररोज 6,000 टन संत्री बांगलादेशला पाठवत होते. पण आता बांगलादेशच्या एका निर्णयाने ही निर्यात रोडवली आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. निवडणुकीच्या धामधुमीत सरकारने या मुद्याकडे लक्ष देण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
आयात शुल्क वाढवले
बांगलादेश सरकारने आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ष 2019 मध्ये 20 रुपये प्रति किलोग्रॅम असे आयात शुल्क होते. ते गेल्या नोव्हेंबर महिन्यात वाढविण्यात आले. हे शुल्क आता 88 रुपये प्रति किलोग्रॅम करण्यात आले आहे. या निर्णयाचा निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. आयात शुल्क चौपट झाल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे निर्यात घटली आहे.
शेतकऱ्यांचे झाले नुकसान
वृत्तसंस्था पीटीआयच्या एका वृत्तानुसार, विदर्भातील शेतकरी या निर्णयाने नाराज आहेत. भारताने बांगलादेशात मसाले, कांदा आणि अन्य उत्पादन पाठविण्यावर बंदी लादल्याने त्याचा बदला म्हणून बांगलादेशने आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. केंद्र सरकारने गेल्या डिसेंबर महिन्यात कांदा निर्यातबंदी लागू केली होती. त्यात आता सूट देण्यात आली आहे. बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात, भूतान, बहरीन, मॉरीशस आणि श्रीलंकेला कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. बांगलादेशला आता कांद्याचा पुरवठा करण्यात येत असल्याने संत्र्यावरील आयात शुल्क कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
संत्र्यांची मागणी का?
बांगलादेशमध्ये संत्र्यांची मागणी अधिक आहे. बांगलादेशी जेवणानंतर नागपूरच्या सत्र्यांचा अस्वाद घेतात. अन्न पचविण्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी संत्रे आरोग्यासाठी चांगले असल्याचा दावा शेतकरी करतात. पोटाला आराम देण्यासाठी बांगलादेशी संत्र्याचा उपयोग करत असल्याचे सांगण्यात येते.
सरकारने केले मान्य
वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी डिसेंबर महिन्यात लोकसभेत ही बाब मान्य केली होती. बांगलादेशने आयात शुल्क वाढविल्याने भारताच्या संत्रा निर्यातीवर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले होते. भारताने आयात शुल्क वाढीचा फेरविचार करण्याची विनंती बांगलादेशाला केल्याची माहिती गोयल यांनी दिली होती.