नागपूर : आयुष्यात शालेय शिक्षण हे जीवन घडवणारे असते. ग्रामीण भागातल्या गुणवंतांना जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) शाळा आपलं करिअर घडवणारे माध्यम असतात. या माध्यमांमध्ये प्रयोग करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (Chief Executive Officer) आता पुन्हा एक नवा पॅटर्न पुढे आणला आहे. स्पर्धा परीक्षेचा ग्रामीण भागातला दीर्घकाळ पाया म्हणजे चौथी आणि सातवीत होणारी स्कॉलरशीप परीक्षा (Scholarship Examination) होती. शासनाने आता ही परीक्षा पाचवी आणि आठवींमध्ये घेणे सुरू केले आहे. या परीक्षेचा पॅटर्न हा स्पर्धा परीक्षांसारखा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना अगदी शालेय शिक्षणात स्पर्धा परीक्षेची गोडी लागते. पाचवी आणि आठवीची स्कॉलरशीप परीक्षा होण्यासाठी वेळ आहे. पण, त्याची विद्यार्थ्यांनी तयारी करावी, यासाठी सराव परीक्षा नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत घेण्यात येणार आहे. नागपूर झेडपीने हा नवा उपक्रम राबविला आहे. याचा निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होईल. यासाठी शिक्षक कामाला लागले आहेत.
स्कॉलरशिप मिळवणे हा एक स्वाभिमान असतो. हे हेरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी संपूर्ण जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला गेल्या तीन महिन्यांपासून या परीक्षेच्या तयारीसाठी प्रेरित केले होते. ग्रामीण भागातील अनेक गुणवान शिक्षकांनी यासाठी मुलांना तयार केले आहे.
परीक्षा आणखी पुढे आहे. मात्र त्यापूर्वी वातावरण निर्मिती व्हावी. मुलांना या परीक्षेचे महत्त्व कळावे, या परीक्षेचे गांभीर्य लक्षात यावे, यासाठी त्याच पद्धतीने अतिशय गंभीरतेने येत्या रविवारी, 13 मार्च रोजी पाचवी व आठवीतील मुलांची स्कॉलरशिपची सराव परीक्षा पूर्ण जिल्ह्यात घेतली जाणार आहे. यावर्षी निश्चितच याचा नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. त्यामुळे रविवारच्या या स्कॉलरशिप परीक्षेकडे शैक्षणिक जगताचे लक्ष लागले आहे.