नागपूर : शेतीमध्ये मनुष्यबळाच्या कमी उपलब्धतेमुळे तसेच यांत्रिकीकरणामुळे थेट शेतापर्यंत रस्ते आवश्यक झाले आहेत. यासाठी राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी पांदण रस्त्याच्या कामाला जिल्ह्यामध्ये प्राधान्य देण्यात येत आहे. या विकास कामात गावागावांत सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला (Collector R. Vimala) यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये (Collector Office) झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर (Chief Executive Officer Yogesh Kumbhejkar) व संबंधित विभागांचे अभियंते, विभाग प्रमुख उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यामध्ये 575 पांदण रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये भिवापूर, हिंगणा, कळमेश्वर, कामठी, काटोल, कुही, मौदा, नागपूर, नरखेड, पारशिवनी, रामटेक, सावनेर, उमरेड, या तेरा तालुक्यांतील 575 मंजूर कामांना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
गावाच्या विकासाच्या दृष्टिकोणातून पांदण रस्ते महत्वाचे असतात. अशा सुमारे पाचशे पांदण रस्त्यांना जिल्हा प्रशासनानं मंजुरी दिली आहे. या कामांमधून गावाचा विकास होणार आहे. त्यामुळं पावसाळ्यापूर्वी हे रस्ते तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. पांदण रस्ते मुख्यत्वे गावातील रस्ते आहेत. यामुळे सर्वांचा फायदा होणार आहे. त्यामुळे रस्त्यांचे काम होत असताना व्यापक जनहित लक्षात घेऊन गावकऱ्यांनी या कामात सहकार्य करावे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
या रस्त्यांसाठी ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग व वन विभाग काम करीत आहे. या चारही विभागाच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी गतीने ही कामे पूर्ण करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहे. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध. योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून राबविण्यात येत आहे. त्यासाठी शेत रस्ते सुद्धा महामार्गा एवढेच महत्त्वाचे आहेत. राज्य शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी गावातील लोकांनी या पांदण रस्त्याच्या निर्माणाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.