नागपूर: नाशिक पदवीधर मतदारसंघात अधिकृत उमेदवार असलेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्जच भरला नाही. त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून पक्षात बंडखोरी केली. त्यामुळे काँग्रेसला ही सीट शिवसेनेला सोडावी लागली. यातून पक्षबाहेर पडत नाही तोच आता काँग्रेसमधील आणखी एक गोंधळ समोर आला आहे. काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांनी नागपूर शिक्षक मतदारसंघात दोन वेगवेगळ्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. तसेच आघाडीने आपण पाठिंबा दिलेल्या उमेदवारालाच पाठिंबा द्यावा म्हणून हालचालीही सुरू केल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे.
काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी शिक्षक मतदारसंघातील उमेदवार राजेंद्र झाडे यांना समर्थन जाहीर केलं आहे. राजेंद्र झाडे हे शिक्षक भारतीचे उमेदवार आहेत. कालच काँग्रेस नेते सुनील केदार यांनी सुधाकर आडबोले यांना पाठिंबा दिला होता. काल काँग्रेसने एका उमेदवाराला पाठिंबा दिलेला असताना काँग्रेसच्या दुसऱ्या नेत्याने दुसऱ्याच उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघातील शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे हे आशिष देशमुख यांच्या भेटीला आले. त्यानंतर आशिष देशमुख यांनी झाडे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. काँग्रेसमध्ये एकवाक्यता नसल्याचं आणि प्रदेशाध्यक्षाचं काँग्रेस नेते ऐकत नसल्याचंही या निवडणुकीच्या निमित्ताने अधोरेखित झालं आहे.
या सर्व प्रकरणावर आशिष देशमुख यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाना पटोले यांच्या मुळं घोळात घोळ सुरु आहे. शिक्षक मतदार संघात सुधाकर आडबले यांना काँग्रेसने समर्थन दिलं, ते वैयक्तिक आहे.
मात्र पदवीधर निवडणुकीत शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांनी काँग्रेसला मदत केली होती. त्यामुळे त्यांना शिक्षक मतदारसंघात मदत करण्याचे काँग्रेस नेत्यांनी वचन दिलं होतं. तेच आश्वासन आम्ही पाळत आहोत. त्यामुळेच राजेंद्र झाडे यांना समर्थन दिलं आहे, असं आशिष देशमुख यांनी स्पष्ट केलं.
मी अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा बोलणार आहे. त्यांनाही राजेंद्र झाडे यांना समर्थन देण्याची विनंती करणार आहे. नागपूर मतदारसंघात राजेंद्र झाडे हे विजयी होऊ शकणारे उमेदवार आहेत. काल काँग्रेस नेत्यांनी जे समर्थन जाहीर केलं, ते त्यांचं वैयक्तिक आहे.
त्या नेत्यांना समर्थन जाहीर करण्याचा अधिकार नाही. प्रदेशाध्यक्षांनी आज राजेंद्र झाडे यांना महाविकास आघाडीचं समर्थन जाहिर करावं, असं आवाहन करतानाच नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपद सांभाळता येत नाही. त्यांना पदावरून हटवावं, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.