नागपूर : मिहान (Mihan) (मल्टी मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब अँन्ड एअरपोर्ट अॅट नागपूर) परिसरात उद्योग समूह सहभाग वाढविण्याचा प्रयत्न राज्य शासनाचा आहे. त्यासाठी नागपूर येथे अॅडव्हाँटेज महाराष्ट्र गुंतवणूक मेळावा घेण्याबाबत शासन विचार करत असल्याचे सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी सांगितले. मिहान प्रकल्पात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विदर्भातील (Vidarbha) उद्योग-व्यापार-औद्योगिक गुंतवणूक वाढावी यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न राज्य शासन करीत असल्याचे स्पष्ट केले. या ठिकाणी सध्या अस्तित्वात असणाऱ्या प्रकल्पांना सवलतीच्या दरात वीज मिळावी, अशी मागणी मिहान येथील बैठकीमध्ये करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मिहानमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्यासोबत सातत्याने संपर्क सुरू आहे. याशिवाय विदर्भात अमरावती व अन्य ठिकाणी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना आवश्यक त्या सुविधा बहाल करण्याबाबत शासन गतिशील आहे. मागील दोन वर्षात विदर्भातील नागपूर व अमरावती विभागात एकूण 445 हेक्टर जागेचे वाटप उद्योजकांना करण्यात आलेले आहे. त्यांची प्रस्तावित गुंतवणूक 10 हजार 49 कोटी इतकी आहे. तसेच त्याद्वारे ३६36 हजार 506 लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे. विदर्भात शंभर कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक करणाऱ्या 11 उद्योजकांना जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. उद्योग उभारण्याच्या दृष्टीने कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यवतमाळमध्ये आस्ट्रेलियाची एक बहुराष्ट्रीय कंपनी उद्योग उभारणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
विदर्भात ऑईल रिफायनरी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव व विदर्भाचा यासाठी विचार करण्यात येण्याबाबतची मागणी केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांनी यासंदर्भात पत्रही दिले आहे. तथापि, महाराष्ट्रातील कोणती जागा निवडायची याबाबतची पसंती ही संबंधित कंपनीवर अवलंबून आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारीतील हा विषय आहे. ज्या कंपनीला महाराष्ट्रात रिफायनरी उभारायची आहे त्या कंपनीचे पाहणी पथक लवकरच राज्यात येणार आहे. सर्व उपलब्ध जागेची ते पाहणी करतील, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
राज्यात सध्या औद्योगिक वसाहतीत किंवा उद्योग समूहात भारनियमन केले जात नाही. याबाबतचे कोणतेच वृत्त नाही. सर्वाना आवश्यक वीज पुरवठा होत असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी उद्योगमंत्र्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) संस्थेला भेट दिली. या संस्थेला वाढीव 60 एकर क्षेत्राची गरज आहे. या संस्थेने तशी मागणी केली असल्याबाबत त्यांनी माध्यमांना माहिती दिली. जागा उपलब्धतेबाबत तपासणी करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. उद्योग मंत्र्यांनी आपल्या दिवसभराच्या दौऱ्यात आयआयएम, मिहान या दोन ठिकाणी प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठकी घेतल्या. सायंकाळी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या 58 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.