औरंगजेबाच्या कबरीचा वाद चांगला पेटला आहे. नागपूरमध्ये तर या मुद्द्यावरून दोन गटात मोठा राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली, त्यानंतर वाहनांची तोडफोड करत अनेक वाहने पेटवून दिली. त्यामुळे नागपूरच्या महल भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या दगडफेकीत 8-10 पोलीस जखमी झाले असून अग्निशमन दलाचे चार जवान जखमी झाले आहेत. तर या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 30 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, भाजपचे स्थानिक आमदारांनी बाहेरून आलेल्यांनीच घरेदारे पेटवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नागपूरमध्यचे आमदार प्रवीण दटके यांनी हा दावा केला आहे. सकाळी एक आंदोलन झालं, पण पोलिसांनी त्यात मध्यस्थी केली. रात्री महाल परिसर आणि इतर परिसरात दगडफेक करण्यात आली. वाहनांची जाळपोळ करण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांना मारहाण करण्यात आली. बाहेरून आलेल्या लोकांनी सामान्य लोकांची घरे पेटवली. टिपून दगडफेक करण्यात आली आहे, असा दावा प्रवीण दटके यांनी केला आहे.
आता परिस्थिती नियंत्रणात आहे. दोन्ही बाजूचे लोक रस्त्यावर आली होती. त्यांनी हिंसा केली. या लोकांवर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी. मी स्वत: नागपूरला जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे, असं प्रवीण दटके यांनी सांगितलं.
आमदार प्रशांत जगताप यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नागपूरची घटना दुर्देवी आहे. राज्यात विस्फोटक परिस्थिती निर्माण झालीय. राज्याला शांतता हवीय की दंगली? नवीन उद्योग येऊ घातले असतानाच सकारात्मक वातावरण होण्यास छेद लागला आहे. नागरिकांचे महागाई ऐवजी इतर मुद्द्यांवर लक्ष नेले जातेय. नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आणा. अन्यथा सामान्य मतदार रस्त्यावर उतरतील. सत्ताधाऱ्यांच्या आवाहनाला बळी पडू नका असे आवाहन आहे. मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतेय त्यावरून लक्ष विचलित केले जातेय. येत्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका आहेत. त्यामुळे हे असं मुद्दामही केलं जातंय का हे पहावं लागेल, असं प्रशांत जगताप म्हणाले.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नागपूर येथील महाल भागात दगडफेकीच्या दुर्दैवी घटनेतून तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची पुरेपूर दक्षता पोलीस प्रशासन घेत आहे. माझे सर्व नागपूरकरांना नम्र आवाहन आहे की, कृपया आपण सर्वांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावे. नागपूर शहराचे सुजाण नागरिक या नात्याने शहरात कसलाही अनुचित प्रकार घडणार नाही, ही आपली जबाबदारी आहे. सामाजिक सलोख्याचे प्रतीक म्हणून नागपूर शहराकडे पाहिले जाते. ही शहराची परंपरा आपण सर्वांनी जपावी. तसेच, प्रशासनावर संपूर्ण विश्वास ठेवत कुठल्याही अफवांना बळी न पडता, नागपूर शहरामध्ये शांतता नांदण्यासाठी सहकार्य करावे, ही विनंती, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कुठल्याही गैरसमज किंवा खोट्या बातम्यांना बळी पडू नका. प्रशासन भक्कमपणे परिस्थिती हाताळत असून आम्ही सर्वजण परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेऊन आहोत. सातत्याने आम्ही पोलीस प्रशासनाची संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. सामाजिक एकोपा हे आपल्या महाराष्ट्राची ताकद असून अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असं आवाहन योगेश कदम यांनी केलं आहे.
कुठल्याही अफवांना बळी पडू नका, सोशल मीडियाच्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन असून त्या ठिकाणी संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन या घटनेची संपूर्ण शहानिशा केली जाईलच पण त्यासाठी नागरिकांनी शांतता बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे हे आवाहन. कोणताही अनुचित गैरप्रकार घडणार नाही याची सर्वांनीच काळजी घ्यावी, असंह आवाहनही त्यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात सागर बंगल्यावर महत्वाची बैठक सुरू आहे. नागपूर प्रकरण शांत कसं होईल आणि जे समाज कंटक आहेत यांच्यावर अंकुश कसा लावावं या बाबत स्थानिक अधिकाऱ्यांसोबत दोन्ही नेत्यांची चर्चा सुरू आहे.