नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची डोकेदुखी वाढवणारी एक बातमी आहे. नवनीत राणा यांच्या अमरावती मतदारसंघावर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी दावा सांगितला आहे. आम्ही अमरावती मतदारसंघातून लढणार आहोत. या मतदारसंघावर आम्ही फोकस केला आहे. भाजप-शिंदे गटाच्या युतीत आम्हाला ही जागा नाही मिळाली तर आम्ही स्वबळावर लढू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नवनीत राणा यांची डोकेदुखी वाढली आहे. मधल्या काळात बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात जोरदार वाद झाला होता. त्यामुळे बच्चू कडू अमरावतीवरील दावा सोडतील अशी शक्यता कमी असल्याचं सांगितलं जात आहे.
बच्चू कडू यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना अमरावतीवर दावा केला आहे. आम्ही अमरावतीची जागा लढवणार आहोत. आम्ही अमरावतीसाठी आग्रही आहोत. आमची तयारी आहे. मी स्वत: अमरावती लोकसभा मतदारसंघातून लढलो होतो. अपक्ष म्हणून मी लढलो होतो. कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाचा मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा नव्हता. तरीही मी फक्त पाच हजार मतांनी पडलो होतो, त्यामुळे ही जागा आम्ही सोडणार नाही. या मतदारसंघात कुणाशीही फाईट झाली तरी आम्ही लढू, असं बच्चू कडू म्हणाले. हा मतदारसंघ आरक्षित असला तरी आम्ही तेवढ्याच ताकदीचा उमेदवार देणार आहोत. त्यामुळे आम्हाला टेन्शन नाही, असंही ते म्हणाले.
आम्हीही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. काल आमची मिटिंग झाली. विधानसभेच्या 15 ते 20 जागा लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. लोकसभेची एक जागा लढवणार आहे. सर्व पक्ष सत्तेत आहेत. घटक पक्ष म्हणून कसे सामोरे जाता येईल हे पाहू. युतीची शक्यता आहे. एकत्र लढण्याची आमची तयारी आहे. पण नाहीच काही ताळमेळ झाला तर स्वतंत्रपणे लढू, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.
आम्ही एकूण 15 ते 20 जागा विधानसभेसाठी लढवणार आहोत. त्यात अमरावती जिल्ह्यातील मेहगाव आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघ आहेत. अकोल्यातील दोन मतदारसंघ आहेत. तसेच वाशिम, नागपूर, नाशिक आणि सोलापूर येथील प्रत्येकी एका मतदारसंघाची बच्चू कडू यांनी मागणी केली आहे. आम्ही निवडक मतदारसंघावर लक्ष दिलं आहे. राज्यभर लक्ष देणार नाही. पण ठरावीक ठिकाणी लक्ष देणार. अमरावतीवर आमचा अधिक फोकस राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.