नागपूर सिटिझन्स फोरमतर्फे खड्डे दाखवा-झोपेतून जागवा अभियानास सुरुवात करण्यात आली. नागरिकांना खड्ड्यांचे फोटो पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागपूर सिटिझन्स फोरमने (Nagpur Citizens Forum) खड्डे दाखवा-झोपेतून जागवा हे अभियान हाती घेतले आहे. आज नागपूर-अमरावती (Nagpur-Amravati) राष्ट्रीय महामार्ग व एसटी स्टॅंडजवळील रस्त्यावर प्रतिकात्मक आंदोलन करीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या आंदोलनात नागपूर सिटिझन्स फोरमचे समन्वयक रजत पडोळे (Rajat Padole) यांनी यमराजाची वेशभूषा साकारली होती. नागपूर- अमरावती महामार्गावरील नागपूर विद्यापीठ कॅम्पस परिसर ते वाडी नाक्यापर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झाली आहे. जागोजागी बारीक गिट्टीचा सडा पडला आहे.
नागपूर-अमरावती या महामार्गावर दररोज लहान मोठे अपघात होतात. ये-जा करणार्या नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. ही समस्या अधोरेखित करण्यासाठी यमराजाची भूमिका साकारून वाहनचालकांची अडवणूक करत जनजागृती करण्यात आली. नागपूरचे खड्ड्येमय रस्ते म्हणजे मृत्यूचा द्वार आहे. म्हणूनच साक्षात यमराज रस्त्यावर उतरले आहेत. जे लोक या रस्त्यांवरुन प्रवास करीत आहेत त्यांना मृत्यूलोकात घेऊन जायला ते आले आहेत. हे अधोरेखित करणारे पथनाट्य यावेळी सादर करण्यात आले. या आंदोलनात फोरमच्या सदस्यांसह स्थानिक नागरिक व या रस्त्यांवरुन दररोज ये-जा करणार्या नागरिकांनी सहभाग घेतला.
नॅशनल हायवे अथॉरिटी, महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी खड्ड्यांच्या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. नागपूरकर नागरिकांनी खराब रस्ते व त्यावरील खड्ड्यांचे फोटो काढून फोरमला पाठवावे. असे आवाहन नागरिकांना सुद्धा करण्यात आले आहे.