नागपूर : उमरेड मार्गावरील वन वे वाहतूक. त्यातही लग्नाची धामधूम. पाच वर्षाची चिमुकला वरातीत मस्त नाचत होता. समोरून खासगी वाहन आले. त्या वाहनाखाली चिरडून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. म्हणून लग्नाच्या वरातीत रस्त्यावर नाचत असाल, तर सावध होण्याची वेळ आली आहे.
चिमुकल्याला खासगी बसने चिरडल्याची घटना बुधवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास विहीरगाव परिसरात कान्हा सेलिब्रेशन हॉलजवळ घडली. संतप्त नातेवाइकांनी बसची तोडफोड करीत आक्रोश व्यक्त केला. शुभम साजन काकडे (वय पाच वर्षे) असे अपघातात मृत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
पारशिवनीजवळील सालई मोकासा येथील साजन काकडे व्यवसायाने शेतकरी आहे. बुधवारी त्यांच्या साळ्याचे लग्न कान्हा सेलिब्रेशन सभागृहात होते. त्या निमित्ताने काकडे परिवार नागपुरात आले होते. लग्नाची जबाबदारी शुभमचे वडील साजन यांच्यावरच होती. रस्त्यावर नाचत असताना चिमुकल्याला समोरून भरधाव येणाऱ्या खासगी बसने धडक दिली. जखमी शुभमला उपचारासाठी भांडेवाडी येथील ग्रेसीयस हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
शुभमच्या मृत्यूने लग्नसमारंभातील पाहुणे आक्रमक झाले. लोकांना संताप पाहता बस चालक पळून गेला. लग्नातील मंडळींनी बसमधील प्रवाशांना खाली उतरविले आणि बसची तोडफोड केली. हुडकेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते पथकासह घटनास्थळी पोहोचले. लोकांना शांत करून बस ताब्यात घेतली. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वाहन फोडणाऱ्या चार ते पाच संशयित नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दिघोरी चौकापासून विहीरगाव रिंग रोडपर्यंत रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. वन वे असल्यामुळं या भागात रस्त्यावर गर्दी असते. त्यात खासगी वाहन चालक बिनधास्त गाड्या चालवितात. पोलिसांच्या मेहरबानीमुळं ते निर्धास्त झाले आहेत. पोलीस खासगी वाहनचालकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालतात. त्यामुळं अशा घटना घडत आहेत.