सुनील ढगे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती मोर्चाकडून परवानगी नसताना मोर्चा काढण्यात येणार होता. त्यामुळं बेझनबाग आणि इंदोरा परिसरात पोलिसांनी 144 कलम लागू केली. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आरएसएस विरोधात मोर्चा काढण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली. त्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर भारतीय मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी कोर्टात गेले. मोर्चाची परवानगी मागणारी याचिका कोर्टाने फेटाळली.
भारतीय मुक्ती मोर्चानं 7 ते 9 ऑक्टोबरदरम्यान सभा घेण्यासाठी अर्ज करावा, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. मात्र आंदोलक मोर्चा काढण्यावर ठाम होते. त्यामुळं बेझनबाग व इंदोरा परिसरात 144 कलम लावण्यात आलंय. या ठिकाणी चारपेक्षा जास्त लोकांनी जमू नये असा आदेश काढण्यात आलाय.
आरएसएस नीती आणि त्यांच्या संघटनेला विरोध होता. हे संविधान विरोधी आहे. आरएसएसमुळं संविधान धोक्यात आलं आहे, असा भारत मुक्ती मोर्चाचा आक्षेप आहे. तरीही भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते तिथं जमले. पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितलं.
मोर्चातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. शेकडो कार्यकर्त्यांनी स्वतःला अटक करून घेतली. आरएसएस विरोधात बेझनबागपासून बडकस चौकापर्यंत मोर्चा काढण्यात येणार होता. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला.
भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी पोलिसांशी बाचाबाची केली. मला ताब्यात घेण्याचे आदेश असतील, तर ते द्या. अन्यथा ताब्यात घेऊ नका, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी त्यांना उचलूनचं नेले.