नागपूर: शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचे दाऊद आणि पाकिस्तानातील एका गँगशी संबंध असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या महिलेची एनआयएमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे. तसेच या महिलेला युवासेनेकडून बळ दिलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केली आहे. शेवाळे यांच्या या आरोपावर ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दाऊदसोबत संबंध असलेल्या महिलेला राहुल शेवाळे पैसे पुरवत आहेत. त्यामुळे शेवाळे यांची अटक करा, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे.
भास्कर जाधव यांनी यावेळी राज्य सरकारवरही टीका केली. सरकारमध्ये ताळमेळ नाही. या सरकारमध्ये कमी आमदार असलेले मुख्यमंत्री आहेत आणि जास्त आमदार असलेले उपमुख्यमंत्री आहेत. हे सरकार म्हणजे बोलाचा भात अन् बोलाचीच कढी आहे. भाजप सारखे निर्लज्ज लोक पाहिले नाहीत, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
रिया चक्रवतीनेच एयूचा खुलासा केला आहे. त्यामुळे कांगावा करणाऱ्यांचं कानफाड फुटलं आहे. अशा लोकांना मी कवडीची किंमत देत नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
नारायण राणे यांनी केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. राणेंची राज्यसभेची टर्म संपत आलीय का हे बघावं लागेल. राणेंचं कर्तृत्व शून्य आहे. कुणाला तरी खूश करण्याकरिता राणे पूर्वीच्या नेत्यांवर टीका करतात. त्या पक्षात जायचं आणि पदं मिळवायचं ही त्यांची खासियत आहे.
त्यांना काहीच किंमत नाही. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे घराण्यावर टीका करत असतात. टीका केल्याशिवाय कोणी किंमत देणार नाही, महत्त्व देणार नाही हे त्यांना माहीत आहे, अशी टीका त्यांनी केली.
एक काळ होता. महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत नव्हता. पण आज सकाळ संध्याकाळ महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत आहे. पर्यायाने गुडघे टेकत आहे. हे चित्रं स्पष्ट झालं आहे. राज्यपालांनी महापुरुषांचा अपमान करूनही केंद्र सरकार त्यांना हटवत नाही. राज्यपालांनी महापुरुषांचा अपमान करावा, महाराष्ट्राचा अपमान करावा ही रणनीती दिसत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
आदित्य ठाकरेंची ब्रेन मॅपिंग टेस्ट करावी अशी मागणी नितेश राणे यांनी केली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. असं असेल तर रमेश गोवेकरचा खून कोणी केला? त्यात कुणाची नावे होती? त्यांचीही नार्को टेस्ट करा. श्रीधर नाईक खुनात कोण आरोपी होते? त्यांचीही नार्को टेस्ट करा.
वळूंज नावाचा जिल्हा परिषद सदस्य होता. त्याचा मर्डर झाला. तो कोणी केला? त्याची नार्को टेस्ट करा. शेख नावाच्या माणसावर गोळीबार झाला, तो करणाऱ्यांची नार्को टेस्ट करा. मुंबईतील हॉटेल जाळलं गेलं. ते कुणी जाळलं? त्याचीही नार्को टेस्ट झाली पाहिजे. अशा पद्धतीने अनेकांची नार्को टेस्ट करावी.
पूजा चव्हाण यांचा छळ करून मृत्यू झाला. त्यात ज्यांची नावे होती त्यांची नार्के टेस्ट करा. त्यामुळे या लोकांनी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्यापेक्षा स्वत:पासून सुरुवात करावी, असं आव्हानच त्यांनी सरकारला दिलं.
फडणवीस, शिंदे आणि बोम्मई यांना अमित शाह यांनी बोलावून घेतलं. दोघांनीही बोलू नये असं सांगितलं. पण शिंदे-फडणवीस यांच्या तोंडाला लॉक लागलंय आणि बोम्मई रोज सीमावर्ती भागामधल्या मराठी माणसावर अन्याय करत आहे.
तरीही महाराष्ट्र सरकार तोंड उघडत नाही. महाराष्ट्राचा अपमान महाराष्ट्रातील लोकांकडूनच करण्याची भाजपची रणनीती दिसत आहे, असा हल्ला त्यांनी चढवला.
चंद्रकांत दादांसारखा मजबूत मंत्री आणि एक चंबू देसाई. त्यांच्या तोंडाचा चंबू झाला. सकाळ संध्याकाळ शिवसेनेवर बोलणारे शंभू यांचा कर्नाटकाबाबतीत मात्र तोंडाचा चंबू झाला आहे. त्यामुळे हे सरकार अन्याय करणारं सरकार आहे. महाराष्ट्राला न्याय मिळण्याची शाश्वती नाही. अपेक्षा नाही, असंही ते म्हणाले.