नागपूर : विधिमंडळ अधिवेशनात भास्कर जाधव आणि संजय शिरसाट यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून तू-तू मै-मै झाले. भास्कर जाधव म्हणाले, देशात सगळ्यात जास्त रेंगाळलेला प्रश्न म्हणजे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आहे. केंद्रात भाजपचं सरकार आहे. कर्नाटकातही भाजपचं सरकार आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार आहे. भाजप आधी आक्रमक भूमिका घेत होती. आता या प्रश्नाला ६२ वर्षे झालीत. याचा एकदा निपटारा व्हावा. ही सगळ्यांचीच मागणी आहे. मराठी माणसाचा छळवाद, अत्याचार थांबणे गरजेचं आहे. मराठी शाळेत जाता येत नाही. मराठी बोर्ड लावता येत नाही, अशी भयावह परिस्थिती आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, सरकार यापूर्वी भास्कररावांचं होतं. त्यांनीही प्रयत्न केला होता. आम्हीही प्रयत्न करतोय. सत्तेत आल्यानंतर प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीनं राजकारण करतात. पाठीवरचे व्रण मी पाहिले आहेत. मार खाल्यानंतर ते संभाजीनगरला आले होते. मराठी माणसावर अन्याय होता कामा नये, अशी आमची ठाम भूमिका आहे.
भास्कर जाधव म्हणाले, जेव्हा एकनाथ शिंदे यांनी मार खाल्ला तेव्हा त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. आज ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यामुळं त्यांच्याकडून हा निर्णय व्हावा, असा आमचा आग्रह असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या हातून हे काम व्हावं. अशी आमची इच्छा असल्याचं जाधव यांनी सांगितलं.
बेळगावमध्ये मराठी माणसांची सत्ता होती. महापौर, उपमहापौरांच्या पाठीवरचे व्रण मी पाहिले असल्यांचं संजय शिरसाट यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे हे ४० दिवस जेलमध्ये होते. भूजबळ हे वेशांतर करून गेले होते. शिवसेनेत आम्ही ३८ वर्षे काढली. माहिती आहे ती पद्धतं, असंही संजय शिरसाट यांचं म्हणणय.