नागपूर : नागपूर महापालिकेच्या माध्यमातून दक्षिण नागपूरमध्ये यामुळं नव्याने विकसित झालेल्या व जलवाहिन्या नसलेल्या भागांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नागपूर शहर हे भारतातील सर्वात सुंदर शहर बनत आहे. नागपूर महापालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरात सर्व क्षेत्राचा विकास करण्यात येत आहे. शहरात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण यासारख्या विविध क्षेत्राचा विकास करण्यात आलेला आहे. त्यामुळे नागपूर देशातील सर्वांगसुंदर शहर राहणार आहे. गडकरी म्हणाले, डबल डेकर उड्डाण पुलाच्या धर्तीवर डबल डेकर (Double Decker) जलकुंभाची (Jalkumbh) संकल्पना पुढे आली. कमी जागेत जागेत जास्त पाणी साठवून नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. शहराला पुढील पंचेवीस वर्षे पाण्याची समस्या येणार नाही, अशी व्यवस्था नागपूर महापालिकेच्या (Municipal Corporation ) माध्यमातून करण्यात आलेली आहे. मागील दहा वर्षात पाण्याच्या समस्येसाठी कुणीही मोर्चा काढलेला नाही. नागपूर देशातील पहिले शहर आहे जिथे चोवीस बाय सात योजना सुरू आहे.
नागपूर शहरातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी नागपूर महापालिकेने शहरात बारा महिन्यांत बार पाण्याच्या टाक्यांचे काम सुरू केले. वर्षभरात शहरात 130 किमीची पाईपलाईन टाकण्यात आली. सोबतच अठरा हजार नवीन घरांना नळाचे कनेक्शन देण्यात आले. यामुळे शहरातील पाण्याची समस्या नक्कीच सुटेल, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर महापालिकेने भारतातील पहिल्या डबल डेकर जलकुंभाचे भूमिपूजन करून नागपूर शहराने एक नवीन इतिहास घडविला आहे. नितीन गडकरी हे आधुनिक भारताचे विश्वकर्मा आहेत, आशा शब्दात महापौरांनी नितीन गडकरी यांचे कौतुक केले.
खालच्या कंटेनरमधून – महाकाली नगर, विणकर कॉलनी, गुरूकुंज नगर, गिता नगर, आकाशनगर, शाहू नगर कल्पतरू नगर. वरच्या कंटेनरमधून – विठ्ठल नगर, वैष्णवमाता नगर, उदयनगर, अमर नगर, सिध्देश्वर नगर, चक्रपाणी नगर, असा पाणीपुरवठा होणार आहे.
देशात प्रथमच डबल डेकर जलकुंभाची निर्मिती, या कामावर होणारा एकूण खर्च 14.45 कोटी, या जलकुंभाचे एकूण दोन कंटेनर आहेत. जमिनीपासून खालच्या (Bottom) कंटेनरची उंची – 21.5 मीटर, जमिनीपासून वरच्या (Top) कंटेनरची उंची – 31 मीटर, मुख्य जलवाहिनी (Feeder Main), आकार- 600 मी.मी. DI K9, एकूण लांबी 1600 मीटर, मुख्य जलवाहिनी ही तपस्या विद्यालय, रिंग रोड येथे अस्तित्वात असलेल्या 600 मी.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीस जोडण्यात येईल. दोन्ही जलकुंभाची क्षमता 20 लक्ष लिटर + 20 लक्ष लिटर आहे. या कामाचा कार्यादेश 24 जानेवारी 2022 रोजी देण्यात आलाय. येथील मातीपरीक्षण करण्यात आले आहे. तसेच कामाचे डिझाईन, ड्रॉईंग तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.