राज्यात लवकर महायुती सरकारचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. काल रात्री दिल्ली दरबारी मोठी खलबतं झाली. त्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर आले आहेत. राज्यात महायुतीची, भाजपाची लाट आणण्यात फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार हे निश्चित होते. त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा देत काँग्रेसमधील बड्या नेत्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विजय वडेट्टीवारांकडून कौड कौतुक
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होत आहेत हा विदर्भाच्या दृष्टीने आनंद आहे, विदर्भाचा बॅकलॉग गेला सात आठ वर्षात पूर्ण झाला नाही, आता अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. त्यांना आता कुबड्यांची गरज नाही, उलट जा कुबड्या आहेत त्या फडणवीस यांच्यावर अवलंबून आहे, असा टोला ही त्यांनी महायुतीमधील भाजपाच्या दोन मित्र पक्षांची नावं न घेता लगावला. आता त्यांना फ्री हॅन्ड काम करण्यासाठी कोणी थांबऊ शकत नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असताना विदर्भाचा लेकरू म्हणून विदर्भातला बॅकलाग, बेरोजगारी शेतकरी प्रश्न या सगळ्या पातळीवर विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवूयात, असे ते म्हणाले.
फडणवीस सूडाचे राजकारण थांबवतील
देवेंद्र फडणवीस यांच्या कडून दुसरी अपेक्षा आहे ते बदला घेण्याचे राजकारण करतात, असं राजकारण ते आता करणार नाही अशी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवायला हरकत नाही, असा चिमटा वडेट्टीवार यांनी काढला. कारण राजकारणात वैचारिक लढाई असावी, वैयक्तिक कोणी कोणाचेही वैरी नाही, त्यामुळे त्यांच्या संदर्भात महाराष्ट्रात जी काही भूमिका जनतेमध्ये होती ती पुसून निघेल आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते छाप पडतील अशी अपेक्षा आहे, असे कौतुक त्यांनी केले.
एकनाथ शिंदे आणि अजितदादांवर टीका
अडीच वर्षे मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला, नेत्याला सत्ता मिळूनही सत्तेची सर्वोच्च खुर्ची मिळत नाही, त्यावेळी चेहरा पडलेला दिसला, असे टोला त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला. 2029 मध्ये येथे दोन्ही चेहरे उपमुख्यमंत्री पदाचे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता आता संपल्यात जमा झालेली आहे. त्यांना सत्तेत मोदी आणि शाह यांच्या आशीर्वादाने राहता येईल, अन्यथा ते काहीही करू शकणार नाही ते विरोध ही करणार नाहीत, अशी जहरी टीका यावेळी वडेट्टीवार यांनी केली.