नागपूर : कानून के हाथ बहोत लंबे होते है! नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय. तीन दिवसांपूर्वी नागपुरातील हुडकेश्वर भागात दोन चोरट्यांनी घरफोडी केली. साडेसात लाखांचा मुद्देमाल घेवून पसार झाले. सतत तीन दिवस ते पोलिसांना चकमा देत होते. सोमेश्वर उर्फ कान्हा कान्होलकर आणि चिडी उईके या चोरट्यांनी चोरीचे पैसे बारमध्ये उडवायला सुरुवात केली. एक दिवस दोघेही फुल्ल दारु पिऊन बारमध्ये बरळायला लागले. चोरी केली, मोठा माल हातात लागला. अपून को कोन पकड सकता, अशा प्रकारे बरडायला लागले. आणि त्याच बारमधून चोरट्यांच्या घरफोडीची टीम पोलिसांपर्यंत पोहोचली. आणि हुडकेश्वर पोलिसांनी सोमेश्वर उर्फ कान्हा कान्होलकर आणि चिडी उईके या चोरट्यांना अटक केली. त्यांच्यापासून घरफोडीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचं हुडकेश्वरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी सांगितलं.
हुडकेश्वरमधील चंद्रशेखर झाडे यांच्याकडे कान्हा आणि चिडी या दोघांनी घरफोडी केली. साडेचार लाखांचे सोने आणि रोकड या चोरट्यांनी लंपास केली. पैसे गरजेपेक्षा जास्त मिळाले. त्यामुळं त्या पैशांना ते बारमध्ये जाऊन उडवू लागले. बारमधून ही माहिती हुडकेश्वर ठाण्याचे हवालदार मनोज नेवारे यांच्यापर्यंत पोहचली. त्यांनी ती ठाणेदार सार्थक नेहरे यांना सांगितली. त्यानंतर बुधवारी पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांच्या दंडुका बसताच चोरी केल्याचे कबुल केले. मंगळसूत्र अंगठी, कानातील वेल, बांगड्या, पचलाकंठी हार असे साडेचार लाखांचे सोन्याचे साहित्य पोलिसांना परत केले. यांना आणखी कुठे डल्ला तर मारला नाही ना. याचा तपास करण्यासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली. पोलीस उपायुक्त नुरुल हसन, सहाय्यक आयुक्त गणेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सार्थक नेहते, द्वितीय निरीक्षक चित्तरंजन चांदोरे, एपीआय स्वप्निल भुजबळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.