नागपूर : कोरोनानं प्रत्यक्ष लाखो बळी घेतले. कोरोनाकाळात (corona) व्यवसाय ठप्प झाल्यामुळं होणार आर्थिक नुकसानीची झळ अद्याप संपली नाही. अशाच आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागपुरातील एका कुटुंबाचा अस्त झाला. 19 जुलै रोजी एका व्यावसायिकाने कार जाळून घेतली. यात अख्ख कुटुंब जळालं. व्यावसायिक रामराव भट (Ram Rao Bhat) यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला. मुलगा नंदन भट यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी संगीता रामराव भट (Sangeeta Bhat) यांचाही मृत्यू झाला. आर्थिक अडचणीतून रामराव यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं. कार जळाल्यानं होरपळून अख्ख कुटुंब ठार झालं.
मुलगा नंदन यानं जखमी असताना पोलिसांना बयाण दिला. मुलाची व्यवसाय करण्याची इच्छा होती. पण, रामराव त्याला नोकरीसाठी आग्रह करत असल्याचं त्यानं सांगितलं. मुलाला काम करण्याचा आग्रह केला. पण, तो काही काम करत नव्हता. कुटुंबाला हातभार लागत नव्हता. त्यामुळं त्यांच्यापुढील संकट गंभीर होत होतं. यामुळं त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. रामराव यांचं नट-बोल्ड उत्पादन करण्याचं काम होतं. कंपन्यांना ते माल पुरवठा करण्याचं काम करत होते. लाकडाऊन लागला आणि उद्योगधंदे बंद पडले. भट यांचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळं ते आर्थिक संकटात सापडले.
घटनेच्या दिवशी रामराव वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. खापरी पुनर्वसन केंद्राजवळ पोहचले. त्यांनी आपली कार थांबविली. पत्नी आणि मुलाला अॅसिटीडीची औषध पिण्यासाठी दिली. पण, मुलाला संशय आला. त्यामुळं त्यानं ते औषध घेतलं नाही. खर तर ते विष असल्याची माहिती नंतर समोर आली. मुलाने औषध पिण्यास नकार दिल्यानं तिघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर ज्वलनशील पदार्थ फवारून कार पेटविली. यात रामराव यांचा जळून मृत्यू झाला होता. पत्नी संगीता व मुलगा नंदन हे दोघेही जखमी झाले होते. आता या दोघांचाही मृत्यू झाला आहे.