नागपूर : देवदर्शन आणि पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबीयांची कार ट्रकवर धडकल्याने झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रामटेकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागपूरहून भंडाऱ्याला परतत असताना रामटेक-भंडारा मार्गावर असलेल्या आरोली खंडाळा गावाजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे भेंडारकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्या सुरु केले.
भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेले राजेश भेंडारकर हे आपल्या कुटुंबीयांसह कारने नागपूर जिल्ह्यातील रामटेक दर्शनासाठी आले होते. कारमध्ये एकून 11 जण होते. यात तीन मुलांचा समावेश आहे. रामटेकला दर्शन घेऊन आणि पर्यटन करुन भेंडारकर कुटुंबीय पुन्हा भंडाऱ्यात आपल्या घरी परतत होते. यावेळी रामटेक-भंडारा मार्गावर असलेल्या आरोली खंडाळा गावाजवळ चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले. कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. यात कारचा चक्काचूर झाला.
अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य आठ जण जखमी झाले. जखमींमध्ये तीन लहान मुलं आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.