नागपूरः सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधान परिषदेत आले. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सीमावादावरुन उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना घेरलं आहे. कोर्टाचा निकाल लागेपर्यंत हा भाग केंद्रशासित करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर सीमावादावरुन लाठ्या काठ्या आणि दिल्ली दौऱ्यांवरुन ठाकरे यांनी शिंदे यांना टोलेही लगावले आहेत.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरुन आता उद्धव ठाकरेंनीही सभागृहात येऊन सरकारला घेरलं आहे. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच, उद्धव ठाकरे विधान परिषदेत आले.
त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्यांना सीमावादावरून जोरदार टोले लगावले आहेत. आणि सीमावादाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत हा वादग्रस्त भाग केंद्रशासित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत, सीमावादावरुन विरोधकांना सवाल केला होता. मी लाठ्या खालल्या तेव्हा प्रश्न विचारणारे कुठं होते असं एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले होते.
त्यावर उद्धव ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिलं. तुम्ही लाठ्या खालल्ल्या त्यावेळी तुम्ही आमच्या पक्षात होता असा जोरदार टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
विधान परिषदेत सीमावादावरुन जसा विषय तापला आहे. तसंच वातावरण विधानसभेतही तापलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई डिवचत असताना आपण गप्प का ?, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. त्यानंतर सीमावादावरुन मुख्यमंत्री ठराव मांडणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
ठाकरे गटाकडून, भास्कर जाधवही बोलण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर फडणवीसांनीच विधानसभेच्या अध्यक्षांना, जाधवांना 1 मिनिट बोलू देण्याची विनंती केली. मात्र भास्कर जाधव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल असं काही बोलले की, जाधव आणि फडणवीस यांच्यामध्येच वाद रंगला.
तर दुसऱ्या आठवड्याचं कामकाज सुरु होण्याआधीच सीमावादावरुन विरोधक आक्रमक होतील, याची कल्पना होतीच. आणि कामकाजाआधी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
बोम्मईंना त्याच भाषेत प्रत्युत्तर देणारा आणि एक इंचही जमीन कर्नाटकला देणार नाही, असं ठणकावून सांगणारा ठराव विधानसभा आणि विधान परिषदेत येणार होता पण मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला गेल्यानं तो प्रस्ताव येऊ शकला नाही.
मात्र उद्धव ठाकरेंनी शिंदेंना त्यावरही डिवचलं..नवस करणे आणि नवस फेडण्यासाठीच मुख्यमंत्री दिल्लीला जातात, असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
आता एक बाब स्पष्ट झाली आहे की, बोम्मईंना सडेतोड उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र सरकारही मंगळवारी म्हणजेच पुढच्या काही तासांतच ठराव आणणार आहेत, त्यावरून त्यावरुन पुन्हा ठाकरे आणि शिंदेंचा विधान परिषदेतही आमनासामना होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.