नागपूर : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी येणे टाळले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते उपस्थित होते. शंभर जन्म घेतले तरी उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा विश्वासघात केला. तुम्ही मोदी आणि अमित शहा यांची बरोबरी करू शकत नाही. मोदी यांची इमेज कितीही खराब केली तरी जनता त्यांच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे यांची राजेशाही गेली नाही. दुसरा नेता असता तर लाल खुर्ची काढली असती. शरद पवार असते तर खुर्ची काढून घेतली असती, असा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी खुर्ची होती. अजित पवार, बाळासाहेब थोरात यांची खुर्ची लहान होती. नाना पटोले यांना माहीत होते सावरकर यांच्याबाबत बोलतील. त्यामुळं त्यांना झोम्बलं असतं. नाना पटोले यांना सभेतून पळ काढावा लागला असता. म्हणून त्यांनी सभेत येण्यास टाळले असेल. कालच्या सभेत सन्मान मिळणार नाही असं नाना पटोले यांना वाटले असेल, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
पुण्यातला उद्धव ठाकरे यांचा मोठा नेता लवकरच भाजपमध्ये येणार आहे. लहान मोठे सर्व नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहे. म्हणून ती शिल्लक सेना, किंचित सेना राहिलीय. ते बोंबाबोंब करण्याचा प्रयत्न करतात, असंही बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे यांना खरंच बाळासाहेबांचे विचार मान्य असतील तर राहुल गांधी यांच्या फोटोला २ जोडो मारावेत, असंही त्यांनी सुनावलं.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या, अशी मागणी होत आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, आमचं सरकार सावरकरांना भारतरत्न कधी देईल त्यांना समजणार सुद्धा नाही. त्यामुळे त्यांनी त्याची चिंता करू नये. आमच्या सरकारने संभाजीनगर नाव केलं हे त्यांना कळाले सुद्धा नाही. अजित दादा जे जे मागतील ते ते आम्ही करणार, असा टोलाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.