मुंबईः मागील काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीने बड्या बड्या नेत्यांसह बारामती लोकसभा मतदार संघात ठाण मांडून आता राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पाडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्या इशाऱ्याचा संदर्भ देत चंद्रशेखर बावनकुळे यांनी घड्याळ बंद पाडण्याचा इशारा बारामतीत येऊन दिला होता, मात्र त्यांना हे माहिती नाही की मी सांगून करेक्ट कार्यक्रम करतो असा टोला अजित पवार यांनी लगावला होता.
त्याला प्रत्युत्तर देत चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार घाबरले आहेत, हे त्यांच्या बोलण्यातूनच दिसतं आहे असा पलटवार त्यांच्यावर केला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवार कुटुंबीयांचा करेक्ट कार्यक्रम बारामतीकर येणाऱ्या काही दिवसातच करतील असा टोलाही त्यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर देत त्यांनी सांगितले की, शेवटी लोकशाहीमध्ये कोणत्याही उमेदवाराला प्रत्येक ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे.
त्यामुळे आम्हीही बारामती लोकसभेचा दौरा केला होता. त्यावेळी समजले की, बारामतीचा विकास म्हणजे बारामती लोकसभेचा विकास नव्हे असा टोला त्यांनी पवार कुटुंबीयांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.
बारामतीचा विकास म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विकास नव्हे असही त्यांनी यावेळी सांगितले आहे. बारामती लोकसभेच्या मतदार संघात पवार कुटुंबीयाविषयी लोकांचा असंतोष आहे. अनेक बड्या बड्या लोकप्रतिनिधींचे राजकारण संपले आहे.
त्यामुळे राजकारणाच्या भ्रमात कोणीही राहू नये असा सल्लाही त्यांनी यावेळी अजित पवार यांना दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पवारांचा करेक्ट कार्यक्रम बारामतीकर करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.