नागपूर: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कोश्यारींना वृद्धाश्रमात पाठवा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. तसेच कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली असून भाजपने राज्यपालांची बाजू घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा अवमानच केला नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते. त्यांनी आता काही बोलणे म्हणजे विनोद केल्यासारखे आहे. राज्यपालांबद्दल उद्धव ठाकरे यांनी असं बोलणे योग्य नाही. राज्यपालांवर अशा पद्धतीने कोणी टीका करत नाही. त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे कोणीही समर्थन करत नाही. पण राज्यपालांची वृद्धावस्था काढली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हीच संस्कृती शिकवली का?, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे. पण राज्यपालांनी अडीच वर्षांमध्ये खूप चांगले काम केले. ते तुम्ही सगळे विसरले का? त्यांनी कधी छत्रपतींचा अपमान केला नाही. बोलण्यामध्ये काहीतरी आक्षेपार्ह आलं आणि हा प्रश्न निर्माण झाला.
या विषयाच समर्थन कोणी करणार नाही. मात्र त्यांनी मागील काळात केलेलं काम बघितलं पाहिजे, असं सांगतानाच व्यक्तिगत टीका टिप्पणी करू नका. हे महाराष्ट्राला शोभण्यासारखे नाही, असं त्यांनी सांगितलं.
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी यांनी उद्गार काढले. त्यावर उद्धव ठाकरे काय बोलले हे सर्वांनी पाहिलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह बोललेलं चालतं आणि ते बोलणाऱ्यांची तुम्ही गळाभेट घेता.
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलचा एकही चुकीचा शब्द बाळासाहेब ठाकरे खपवून घेत नव्हते आणि तुम्ही त्यांच्याशी युती करायला निघाले? तुम्ही सगळं सोडलं आहे. हिंदुत्वही सोडलं आहे, असा हल्ला त्यांनी चढवला.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचंच सरकार हुकूमशाही पद्धतीने चाललं होतं. नवीन सरकार चांगलं काम करत आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे, अशी टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्योतिषाकडे गेले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. अधिकार आहे. त्यांनी कसं वागावं, कुठे जावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे.
मात्र, शरद पवार यांच्याकडून वैयक्तिक टीकेची अपेक्षा नव्हती. अशी टीका करून पवारांनी आपलीच प्रतिमा मलिन केली आहे, असा चिमटा त्यांनी काढला.
संजय राऊत हे आमदारांना आज रेडे म्हणत आहेत. जेव्हा याचा आमदारांना तिकीट दिलं तेव्हा ते शिवसैनिक होते. ते बाहेर पडले म्हणून आता रेडे झाले काय? असा सवाल त्यांनी केला.
खुर्ची गेल्याने राऊत अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते राग काढत आहेत. कुठल्या ना कुठला विषय घेऊन ते आपला राग व्यक्त करतात, असं मला वाटतं, असा टोलाही त्यांनी लगावला.