फडणवीसांच्या नेतृत्वातील डाव त्यांच्यावरच उलटेल; छगन भुजबळांचा इशारा

| Updated on: Oct 19, 2021 | 1:27 PM

ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व यंत्रणांचा अतिरेकी वापर सुरू आहे. (chhagan bhujbal slams devendra fadnavis over ed action)

फडणवीसांच्या नेतृत्वातील डाव त्यांच्यावरच उलटेल; छगन भुजबळांचा इशारा
chhagan bhujbal
Follow us on

चंद्रपूर: ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व यंत्रणांचा अतिरेकी वापर सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला हा डाव त्यांच्यावरच उलटेल, असा इशारा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

छगन भुजबळ चंद्रपुरात आले होते. महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यापूर्वी मीडियाशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देण्याचं काम करत आहे. सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु, भाजप यंत्रणांच्या बळावर सरकार बनवू शकत नाही, असं सांगतानाच राज्यातील आघाडी सरकार भक्कम असल्याचा दावा भुजबळ यांनी केला आहे.

आकस बुद्धीने कारवाई

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना ईडीने समन्स बजावलं आहे. त्यांचीही चौकशी होणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मंदाकिनी खडसे यांच्यावर आकस बुद्धीने कारवाई केली जात आहे, असा आरोप भुजबळ यांनी केला आहे.

बोलतच राहणार

दरम्यान, काल भुजबळांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय होत आला आहे. ओबीसींच्या प्रश्नांवर जो बोलतो त्याला त्रास देण्याचे काम सुरू आहे. मात्र कितीही त्रास दिला तरी ओबीसींच्या प्रश्नांसाठी बोलतच राहणार असे त्यांनी सांगितलं.

म्हणून ओबीसींचं नुकसान होतंय

आज ओबीसी आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात काम करणाऱ्यांना बाजूला करा. राज्य सरकार हे ओबीसी घटकाचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी प्रत्येक मार्ग तपासून पाहत आहे. न्यायालयीन लढाई देखील राज्याची सुरू आहे. मात्र न्यायालयाला हवी असलेला इंपिरिकल डाटा हा केंद्र सरकारकडे आहे. तो केंद्र सरकार द्यायला तयार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होते आहे. असे त्यांनी सांगितलं.

भूलथापांना बळी पडू नका

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न नेमका काय आहे हे समजावून सांगताना मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाचा इतिहासच जनतेसमोर मांडला यावेळी आरक्षणासाठी करावा लागलेला संघर्ष देखील श्री भुजबळ यांनी आपल्या भाषणातून मांडला. आज अनेक जण इतिहासाची मोडतोड करत आहेत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे खोटे वारसदार आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी उभे केले जात आहेत मात्र जनतेने यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केलं.

 

संबंधित बातम्या:

VIDEO: माझाही साखर कारखाना प्रचंड आर्थिक अडचणीत, पंकजा मुंडेंनीच सूचवला केंद्राला उपाय

अरुणाचल प्रदेशात पहिल्यांदाच एव्हिएशन ब्रिगेड तैनात, आता सीमा पार करण्याची चीनची बिशाद काय!

शहांसोबत सहकारावर चर्चा, दिल्लीत महत्त्वाची बैठक, फडणवीस, दानवेंसह विखे-पाटीलही उपस्थित राहणार

(chhagan bhujbal slams devendra fadnavis over ed action)