नागपूर : भाजप नगरसेवक छोटू भोयर यांनी आज रीतसर काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. भाजपचे उमेदवार हे नामांकन अर्ज भरत असताना छोटू भोयर यांचा काँग्रेस प्रवेश हे भाजपच्या पराभवाची नांदी आहे, असं मत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केलंय.
छोटू भोयर याना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा आहे. मात्र, त्यावर निर्णय अजून झाला नाही. नितीन राऊत म्हणाले, काही घटना या आश्चर्य चकित करणाऱ्या असतात. काँग्रेस पक्ष जो उमेदवार देईल, तो विजयी होईल. उमेदवाराबद्दल निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर होईल. आम्ही सगळे तो निर्णय मान्य करून त्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू. आमची तयारी पूर्ण झाली आहे, असेही म्हणत लवकर काँग्रेसच्या विधान परिषद नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या उमेदवाराचे नाव जाहीर होईल, असेही पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.
छोटू भोयर हे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. ते संघाचे स्वयंसेवक आहेत. मात्र गेले अनेक वर्षे ते नगरसेवक पदाच्या वर गेले नाही. त्यामुळं त्याची खदखद त्यांच्या मनात होती. आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसला महापालिकेत 100 पेक्षा जागा मिळतील. त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित यावं असं आवाहन त्यांनी केलं. छोटू भोयर यांच्या काँग्रेस प्रवेशानं काँग्रेसची ताकत नक्कीच वाढेल. मात्र त्याचा उपयोग काँग्रेस कसा करून घेते हे बघावं लागेल.
भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांच्याकडं शनिवारी रात्री छोटू भोयर यांनी भाजपचा राजीनामा पाठविला. गेल्या वीस वर्षांपासून भाजपचा पदाधिकारी राहिलो. पण, पक्षात फारसी प्रगती झाली नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. काँग्रेस पक्षानं विधान परिषद निवडणुकीत संधी दिली आहे. त्यामुळं या निवडणुकीत मी ताकदीनं समोर जाईन, असा विश्वास छोटू भोयर यांनी व्यक्त केला. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नागपूर जिल्ह्यात दबदबा कुणाचा आहे, ते कळेल, असंही ते म्हणाले.