नागपूर : तीन महिन्यांत उद्योग बाहेर जायला ती जादूची कांडी आहे का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला लगावला. राज्यातून बाहेर गेलेल्या उद्योगांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे भाष्य केलं आहे. आमचं सरकार उद्योगांना चालना देणार आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटलंय. नागपुरात विमानतळावर उतरल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
क्लस्टर प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं विरोधकांनी टीका केली आहे. या टीकेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कुठलाही प्रकल्प तीन महिन्यात येतो आणि जातो असं कधी घडत नाही. ही काही जादूची कांडी नसते की, फिरवलं नि इकडं आला नि तिकडं गेला. आरोप करायचं तर कुणीही आरोप करू शकतो. असा टोलाही त्यांनी माहाविकास आघाडीला लगावला. आमचं सरकार उद्योगांचा चालना देणारं, उद्योगांचं स्वागत करणार सरकार आहे, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलो. प्रकल्पांना चालना देण्याचा प्रयत्न करतोय. विकास कामांना प्राधान्य देतोय. विकास प्रकल्पांना वॉररुममध्ये घेतलं. नागपूर ते शिर्डी हा महामार्ग तयार आहे. लवकरच सुरू होईल.
आजचा कार्यक्रम हा विकासाच्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण असं आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांचं नागपूर विमानतळावर जोरदार स्वागत केलं. यावेळी मंत्री उदय सामंत, खासदार कृपाल तुमाने, किरण पांडव उपस्थित होते.
गोसेखुर्द जलपर्यटनाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आंतरराष्ट्रीय जलपर्यटनाची पाहणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. गोसेखुर्द जलपर्यटन हा पूर्व विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे.
100 कोटी रुपये खर्च करून गोसेखुर्दचं जलपर्यटन विकसित केलं जाणार आहे. जलपर्यटन आणि जलक्रीडेचे काही प्रकार येथे सुरू होणार आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांनी आजचा हा दौरा केला.