नागपूर : 15 ते 18 वयोगटातील मुलं जास्त भटकतात. घराबाहेर जातात. टोळक्यांनी फिरतात. यातून ते संसर्ग घेऊन घरात येऊ शकतात. त्यामुळं ही मुलं खऱ्या अर्थानं सुपरस्प्रेडर आहेत, असं मत बालकांच्या लसीकरणाचे ट्रायल घेणारे डॉ. वसंत खडतकर यांनी व्यक्त केलं. त्यांचं लसीकरण करून घेणं कसं आवश्यक आहे, तेही त्यांनी सांगितलं.
15 ते 18 या वयोगटातील मुलांना आजाराचे लक्षणं कमी येण्याची शक्यता आहे. पण, ते जास्तीत जास्त फैलाव करणारे लोक राहणार आहेत. त्यामुळं जास्तीत-जास्त लोकांना यातून वाचवायचं असेल, तर लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. तसंच मुलांना शाळेच्या दृष्टिकानातून बघायचं असेल, तर हे लसीकरण लवकरात लवकर देणे अत्यंत आवश्यक आहे, असंही डॉ. वसंत खडतकर म्हणाले.
लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसीसाठी मोठांना दिलेल्या लसीचाच वापर करण्यात येणार आहे. मोठ्यांना दिलेली कोव्हॅक्सिन लस ही 15 ते 18 वयोगटाला देण्यात येणार आहे. एक जानेवारीपासून लसीकरणाची नोंदणी, तर तीन जानेवारीपासून लसीकरण करण्यात येणार आहे. लहान मुलांवर चाचणी करणारे डॉ. वसंत खडतकर यांनी ही माहिती दिली आहे. लहान मुलांना 28 दिवसांच्या अंतरानं दोन डोस दिले जाणार आहेत. लहान मुले ओमिक्रॉनचे सुपर स्प्रेडर असणार आहेत. म्हणून कोव्हॅक्सिन लस लहान मुलांना संरक्षण देईल, असं डॉ. वसंत खडतकर यांचं मत आहे. ट्रायलमध्येही प्रोढांना दिली गेलेलीच लस वापरण्यात आली होती. ती सुरक्षित असल्याचं सिद्ध झालंय.
मनपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. सध्या नागपुरात एअर अरेबिया हे विमान येत आहे. या विमानातून आलेले प्रवासी कोरोनाबाधित निघाले आहे. त्यामुळे आता सर्व विदेशी प्रवाशांची चाचणी विमानतळावरच करा, असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. ज्या प्रवाशांचा कोरोना अहवाल सकारात्मक येईल त्यांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठविण्यात यावे, अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या. प्रवाशांच्या संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था मनपा तर्फे सिव्हिल लाईन्स येथील आमदार निवास येथे करण्यात आली आहे. तसेच ज्यांना हॉटेलमध्ये राहायचं असेल त्यांना हॉटेल अल-झम-झम आणि हॉटेल ओरिएंटल येथे स्वखर्चाने विलगीकरणात राहता येणार आहे.