नागपुरात महायुतीची बैठक; जागा वाटपासह ‘या’ मुद्द्यांवर चर्चा

| Updated on: Sep 01, 2024 | 10:03 AM

CM Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Meeting : नागपुरात महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीत जागा वाटपासह 'या' मुद्द्यांवर चर्चा झाली. महायुतीतील वाचाळवीरांबाबत या बैठकीत चर्चा झालीय. सुनील तटकरे यांनी या बैठकीबाबत माहिती दिली आहे. वाचा सविस्तर...

नागपुरात महायुतीची बैठक; जागा वाटपासह या मुद्द्यांवर चर्चा
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार
Image Credit source: ANI
Follow us on

महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. अशात जागावाटप आणि इतर बाबींसंदर्भात महायुतीची बैठक पार पडली आहे. उपराजधानी नागपूरमध्ये ही बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची नागपूरच्या रामगिरी बंगल्यावर झाली. ही बैठक आता संपली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल, हे नेते देखील बैठकीला उपस्थित होते. महायुतीच्या नेत्यांमध्ये जवळपास 4 तास 30 मिनिटं बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकीतील जागावाटप आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

नागपुरात बैठक

आगामी निवडणुकीत कोण किती जागा लढणार? कोणत्या जागेवर कोणता पक्ष लढणार? याबाबतही या बैठकीत चर्चा झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विदर्भ आणि महाराष्ट्रातील जागा वाटपाच्या संदर्भाने चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे राज्यात ज्याप्रमाणे वातावरण सुरू आहे. विरोधी पक्षाकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासंदर्भात सुद्धा चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीतील घटक पक्षांना किती जागा सोडता येऊ शकतात? कोणत्या जागा दिल्या जाऊ शकतात या संदर्भात सुद्धा चर्चा झाली असल्याची माहिती आहे. महायुतीची ही महत्त्वाची बैठक समजली जात आहे.

मागच्या काही दिवसांपासून महायुतीत ‘शाब्दिक वॉर’ सुरु आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. या वाचाळवीरांबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. तिन्ही पक्षातील वाचाळवीरांना समज देण्यासंदर्भात सुद्धा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. काही लोकांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये वाद वाढू नये, याची काळजी घेतली पाहिजे. यावर सुद्धा चर्चा झाल्याची माहिती आहे.

तटकरेंची प्रतिक्रिया

महायुतीच्या बैठकबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. बैठक अतिशय व्यवस्थित आणि सकारात्मक पार पडली. विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, असं तटकरे म्हणाले. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. यावरून महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. आज मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. यावर तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवरायांचा पुतळा कोसळणं ही दुर्दैवी आहे. मात्र महाविकास आघाडी या घटनेचे राजकारण करत आहे, ते अयोग्य आहे. देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे याचं राजकारण करणं योग्य आहे असं मला वाटत नाही, असं तटकरे म्हणाले.