नागपूर : कोरोनात मृत्यू झालेल्यांच्या मुलांना अनुकंपात पोलीस विभागात नोकरी देण्यात आल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. 296 अनुकंपाधारक पोलीस (Compassionate Police) झाले. दुसऱ्या पिढीतंही खाकी वर्दी घालणार आहेत. नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात दीक्षांत समारंभ (Convocation Ceremony at Training Center) पार पडला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. मुंबईतील सर्वाधिक प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश आहे. नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांच्या उपस्थितीत दीक्षांत समारंभ पार पडला. कोरोनाकाळात मृत्यू झालेल्या पोलिसांना त्यांच्या मुलांना नोकरी मिळाल्यानं खरी श्रद्धांजली असल्याचं अमितेश कुमार म्हणाले. प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर समाजात शांतता, सौहार्द वाढविण्याचे काम करा. तसेच समाजाला पोलिसांचा अभिमान वाटेल, असे कार्य करण्याचा सल्ला अमितेश कुमार यांनी प्रशिक्षणार्थी पोलिसांना दिला. शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडणार्या प्रशिक्षणार्थींच्या 110 व्या सत्राचा दीक्षान्त समारंभ सोमवारी पार पडला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
या प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींची कार्यक्षमता तसेच मानसिक स्थिती बळकट करण्याचे काम होते. उत्कृष्ट दर्जाची परेड झाल्याबद्दल प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करताना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आत्मपरीक्षण करून उत्कृष्ट सेवा देण्याचे आवाहन अमितेश कुमार यांनी केले. पोलीस जनतेसाठी चांगली सेवा देऊ शकतो, असेही ते यावेळी म्हणाले. प्रमुख अतिथी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दीक्षान्त संचलनाची मानवंदना स्वीकारली. पोलीस प्रशिक्षण केंद्रांच्या प्राचार्य चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी अमोल करे यांच्या नेतृत्वात परेडचे उत्कृष्ट संचलन करण्यात आले. या संचलनात एकूण 296 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस उपायुक्त चिन्मन पंडित, पोलीस उपायुक्त डॉ. अंकुश शिंदे, फॉरेन्सिक लॅबचे उपसंचालक विजय ठाकरे, प्राचार्य चेतना तिडके, उपप्राचार्य शोभा पिसे यावेळी उपस्थित होत्या.
पोलीस प्रशिक्षण केंद्रातर्फे नऊ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत राज्यातील विविध घटकातून एकूण 296 पोलीस प्रशिक्षणार्थींना पोलीस विभागातील कामकाजासह कायद्याचे, शस्त्रांचे व मैदानी कवायतीचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमादरम्यान अष्टपैलू प्रथम क्रमांक नाना सिरसाठ, व्दितीय सूरज देशमुख, तृतीय स्वप्नील खरात तसेच आंतरवर्ग प्रथम क्रमांक स्वप्नील खरात व बाह्यवर्ग प्रथम क्रमांक अमोल करे, उत्कृष्ट पी.टी. प्रथम क्रमांक अमोल करे, सर्वोत्कृष्ट कमांडो सूरज देशमुख, सर्वोत्कृष्ट गोळीबार नेमबाज अमर साळवी, परेड कमांडर अमोल करे यांना मुख्य अतिथींच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.