नागपूर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये (Congress) अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात वाद असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी दिल्लीतील काँग्रेस हायकमांडकडे नाना पटोले यांची तक्रार केल्याची माहिती समोर आली. बाळासाहेब थोरात यांनी तर काँग्रेस हायकमांडला पत्र लिहून नाना पटोले यांच्यासोबत काम करणं कठीण होऊन बसल्याची तक्रार केली. या सगळ्या घडामोडींनंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भरसभेत नाना पटोले यांच्या स्वभावाबद्दल गुपित सांगितलं आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा नागपुरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री सुनील केदार उपस्थित होते. यावेळी अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांच्याबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं.
“नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सुधाकर अडबाले यांना उमेदवारी दिली पाहिजे. यासाठी काँग्रेस नेते सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांनी मला फोन केले. तुम्ही यात हस्तक्षेप करा, अशी विनंती केली होती. त्यावेळी मी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन केला”, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
“नाना पटोले माझं ऐकतात. फक्त त्यांना समजून सांगण्याची पद्धत वेगळी असली पाहिजे. ते तुमचं ऐकतात की माहीत नाही. तुमची पद्धत व्यवस्थित असली पाहिजे”, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी सुनील केदार यांना टोला लगावला.
“नाशिकमध्ये ऐकलं असतं तर हेच झालं असतं. नाना पटोले असो किंवा बाळासाहेब थोरात असो काही वाद नाही. हा आमचा पेलातला वादळ आहे. पेल्यात फार विषय नाही”, असंही वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.
“नागपूर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत जुनी पेन्शन हा मोठा मुद्दा होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आम्ही पेन्शन देऊ शकत नाही’, असं वक्तव्य सभागृहात केलं होतं. त्यांनी असं वक्तव्य केलं म्हणून आम्ही जिंकलो. त्यांनी असेच वक्तव्य करत राहो आणि आम्हाला विजय मिळत राहावा”, असं अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
“विदर्भात काँग्रेस जशी आहे तशीच आहे. थोडी ताकद लावली की निवडून येणं शक्य आहे. काँग्रेस शासित राज्यात जुनी पेन्शन आम्ही लागू केली”, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला
“ओबीसी आरक्षणाचा राज्याला अधिकार नाही हे मी वारंवार सांगितलं होतं. मात्र मला खोटं ठरवलं जात होतं. पण जेव्हा केंद्राने हा अधिकार दिला तेव्हा सगळं समोर आलं की, राज्याला अधिकार आता मिळाला, म्हणजे पहिले नव्हता. मात्र आरक्षणाचा मुद्दा जसा आहे तसाच आहे”, असं अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.