नागपूर : महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. राज्य विधी मंडळाचं येत्या 17 जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनाच्या आधी काँग्रेसने नेमकी काय रणनीती आखली आहे, याबाबतची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. नाना पटोले यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. विशेष म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेल्या विस्ताराच्या मुद्द्यावरुन काँग्रेस राज्यपालांकडे थेट राष्ट्रपती राजवटची मागणी करणार आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं. तसेच पावसाळी अधिवेशनाआधी विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड होणार आहे. त्यासाठी उद्या दिल्लीत खलबतं होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांची नुकतीच दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर आता उद्या दिल्लीत पुन्हा बैठक पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. नाना पटोले या बैठकीसाठी उद्या दिल्लीला जाणार आहेत. या बैठकीत विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण होणार? याबाबतचा निर्णय होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्याने आता विधानसभेचा विरोधी पक्षनेता ठरवला जाणार आहे. विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे होतं. पण आता काँग्रेसने त्यावर दावा केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं नाव चर्चेत होतं. पण उद्या काँग्रेसचं दिल्लीतील हायकमांड अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
“राज्यातील जनतेला ‘अलीबाबा चालीस चोर’ या कथेची आठवण व्हायला लागलीय. कारण जनतेच्या प्रश्नांशी सत्ताधाऱ्यांना काहीच देणंघेणं नाही. जनतेनेने 105 आमदार भाजपचे निवडून दिले. ही चूक झाली असं जनतेला वाटायला लागलंय”, असा दावा नाना पटोले यांनी केला. “शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय. निवृत्त शिक्षकांना पुन्हा कंत्राटी काम दिलं जाईल, असा जीआर काढलाय. तरुणांवर हा अन्याय आहे”, असंही पटोले यावेळी म्हणाले.
“मंत्रीमंडळाचा विस्तार न होणं म्हणजे जनतेच्या पैशांवर डल्ला मारण्याचं काम आहे. हे सरकार असंवैधानिक आहे. या सरकारचा निषेध करतो. राज्यात कायदा-सुव्यवस्था नाही. त्यामुळे राज्यात तातडीने राष्ट्रपती राजवट लागावं. महाराष्ट्राचे विदृप चित्र निर्माण करण्याचं काम सुरु आहे. राज्याच्या इतिहासात ही पहिली घटना आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार न करणे, खातेवाटपात मलाईचे खातं मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आता तातडीने राज्यपालांनी, राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा”, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
“ईडी, सीबीआयची भिती दाखवून विरोधकांना भीती दाखवली जात आहे. हे मायबाप सरकार नाही, जनतेला लुटण्याचं काम सुरु आहे. अधिवेशनात हे प्रश्न मांडणार. भाजपने महाराष्ट्राला कलंक लावला, कुण्या एका नेत्याला इतरांसारखे म्हणणार नाही. पण भाजपने महाराष्ट्राला कलंक लावला. आम्ही राष्ट्रपती शासनसाठी राज्यपालांना भेटणार”, असं नाना पटोले यांनी सांगितलं.
“विरोधी पक्षनेतेपदाबाबत अधिवेशन सुरु होण्यापूर्वी निर्णय होणार. ज्या पक्षाचे जास्त आमदार, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होतो. ही सिस्टीम आहे. आमची संख्या आहे. आता महाविकास आघाडीच निर्णय घेणार”, असं नाना पटोले म्हणाले.