नागपूर : नागपूर विधान परिषद निवडणुकीत चांगलीच रंगत आली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला. परंतु, भाजपातून काँग्रेसमध्ये (Congress) आलेल्या छोटू भोयर (Chhotu Bhoyar) यांची फसगत झाली. त्यांना फक्त एक मत मिळालंय. पाहुयात नेमकं काय आणि कसं घडलं.
मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट झालं. चंद्रशेखर बावनकुळे 362, डॉ. रवींद्र भोयर 1, मंगेश सुधाकर देशमुख 186 अशी मतं पडली. एकूण वैध मते 549, तर अवैध मते 5 झाली. निवडणुकीसाठी ठरलेला कोटा : 275 चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिल्याच फेरीत पूर्ण केला. त्यामुळं त्यांना विजयी उमेदवार जिल्हाधिकारी विमला आर. यांनी घोषित केलं. चर्चा राहिली ती छोटू भोयर यांची.
छोटू भोयर यांची कारकीर्द भाजपात गेली. नितीन गडकरींसोबत राहून त्यांनी पक्षाच काम केलं. ते नगरसेवक झालेत. ज्येष्ठ नगरसेवक अशीच त्यांची ओळख होती. त्यांची जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या मुशीत घडली. पण, गेल्या काही दिवसांपासून अपमान होत असल्यानं आपण काँग्रेसचा हात धरल्याचं भोयर यांनी सांगितलं. खर तर नाना पटोले यांनी त्यांच्या हातात काँग्रेसचा हात सोपविला.
छोटू भोयर यांना काँग्रेसनं विधान परिषदेची उमेदवारी दिली. पण, ते प्रचारात रस दाखवित नसल्याचं काँग्रेसच्या नेत्यांच्या लक्षात आलं. त्यामुळं ऐनवेळी त्यांची उमेदवारी बदलविण्यात आली. अपक्ष मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला. सुनील केदार यांना यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळं भोयर यांना महाविकास आघाडीच्या कुणी मतच दिलं नाही. त्यांना मिळालेलं एक मत त्यांचच असेल, असं बोलल जातं.
उमेदवार बदलविल्यानं छोटू भोयर नाराज झालेत. पण, पक्षानं दिलेला निर्णय त्यांनी मान्य केला. भोयर यांनी भाजपला आधीच बाय-बाय केलं होतं. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करू, असं त्यांनी सांगितलं. पण, आता त्यांची घुसमट होणार आहे. ना काँग्रेस ना भाजप अशीच त्यांची अवस्था झाली आहे. काँग्रेस पक्षानं मतं न दिल्यानं ते महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा मनापासून प्रचार करतील, असं वाटत नाही. त्यामुळं काँग्रेसला मनपा निवडणुकीत त्यांचा हवा तसा फायदा होणार नाही, असंच दिसतं.