नागपूर : महामंडळ वाटपाची तयारी पूर्ण झालीय. येत्या हिवाळी अधिवेशनानंतर राज्यात महामंडळ वाटप होणार आहे. महाविकास आघाडीत महामंडळ वाटपावर तिन्ही पक्षात एकमत झाल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना आज सांगितलं.
काँग्रेसमध्ये कुणाला मंत्री ठेवायचं की नाही याबाबत हायकमांड निर्णय घेणार असल्याचं पटोले म्हणाले. मी आघाडीत मंत्रीपद मागितलं नाही. काँग्रेसच्या मंत्र्यांचे खातेबदल किंवा मंत्री बदल करण्याबाबत हायकमांड निर्णय घेणार असंही त्यांनी सांगितलं. काँग्रेसमध्ये अंतर्गत फेरबदल हायकमांडच्या हातात आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षाची या अधिवेशनात निवड होणार असल्याची माहितीही नाना पटोले यांनी दिली.
आज देशात जी परिस्थिती आहे. त्यात देश विकणाऱ्यांसोबत राहायचं की, देश वाचवणाऱ्यांसोबत राहायचं हे राजकीय पक्षांनी ठरवायचं आहे, असं आवाहन त्यांनी केलं. भाजप सरकारने देशाची तबाही केलीय. अशा वेळेस ममता बॅनर्जी यांचं वक्तव्य देश विकणाऱ्यांची साथ देणारं होतं. आज सामनातून जी भूमिका मांडली ती देश हितासाठी मांडलीय. सरकार वाचवण्यासाठी नाही. सामनातून ममता बॅनर्जी यांच्यावर केलेली टीका योग्य असल्याचं मतही पटोले यांनी व्यक्त केलंय.
सेवा नियमानुसार एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी. संपामुळे प्रवाशांचं मोठं नुकसान होतंय. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, ही काँग्रेसची भूमिका असल्याचं ते म्हणाले. विधान परिषद निवडणुकीत काही लोक घोडेबाजार करतात. काही लोक विचाराने जिंकतात. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने दिलेला उमेदवार विचाराने निवडणूक लढत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतंत्र लढल्यावर लोकांच्या हातात आहे. शेवटी लोकशाहीत लोकांच मत ज्याच्याकडं तो सत्ताधीश ठरतो, असंही पटोले म्हणाले.