नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून मोठमोठे दावे करण्यात येत आहेत. प्रत्यक्षात नागपूर शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येण्याऐवजी प्रचंड गतीने वाढत आहे. त्यामुळेच दैनंदिन रुग्णसंख्येचे नवनवीन रेकॉर्ड नागपुरात तयार होत आहेत. गुरुवारी तर चार मे 2021 नंतरची सर्वांत उच्चांकी म्हणजेच तब्बल चार हजार 428 नवे रुग्ण आढळलेत. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. चोवीस तासांमध्ये रुग्णसंख्येत एक हजार 132 ने वाढ झाली झाली आहे. प्रशासन कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व चाचण्यांवर भर देत आहे. प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करीत आहे. त्यांचा हा दावा कुठेतरी प्रत्यक्षात दिसून येत नाही.
गुरुवारी जिल्ह्यात 13 हजार 848 चाचण्या करण्यात आल्यात. यामध्ये शहरात 10 हजार 17 व ग्रामीणमध्ये 3 हजार 831 चाचण्यांचा समावेश आहे. त्यापैकी तब्बल 31.98 टक्के अहवाल सकारात्मक आढळून आलेत. यामध्ये शहरातून 3 हजार 186, ग्रामीणमधून 1 हजार 153 तर जिल्ह्याबाहेरील 89 अशा ४ हजार 428 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 21 हजार 654 वर पोहोचली आहे.
शहराची जबाबदारी असलेल्या महापालिकेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. महापालिकेतील अनेक अधिकार्यांना व कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात नगरसेवकांनाही कोरोनाचे संक्रमण झाले आहे. अनेक नगरसेवकदेखील कोविड पॉझिटिव्ह आहेत. प्रशासन आणि पदाधिकारीच आता कोरोनाच्या विळख्यात सापडलेत. त्यामुळं शहरातील ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु, प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारीच बाधित आहेत. नगरसेवकही संक्रमित झाले आहेत. त्यामुळे ही सभा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सभा येत्या 25 जानेवारी रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर शहरात कोविडचे संक्रमण वाढण्याची गती अधिक आहे.