नागपूर : बोर व्याघ्र प्रकल्प ( Bor Tiger Project) व उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यांतर्गत 16 मे 2022 रोजी निसर्गानुभव कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत मचान बुकिंगची सुविधा http://www.mahaecotourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. निसर्गानुभव कार्यक्रमासाठी वन परिक्षेत्रनिहाय मचान याप्रमाणे उपलब्ध राहणार आहेत. उमरेड-पवनी-कऱ्हांडला (Umred-Pawani-Karhandla)अभयारण्यामध्ये कुही 10 व एकूण मचान क्षमता 20 अशी आहे. पवनी 8 व एकूण क्षमता 16, उमरेड 10 व एकूण मचान क्षमता 20 अशी आहे. बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये बोर व नवीन बोर प्रत्येकी 10 व एकूण मचान क्षमता 20 अशी आहे. निसर्गानुभव कार्यक्रमांतर्गत अभयारण्य क्षेत्रातील मचानावर 16 मे रोजी दुपारी 3 वाजेपासून तर दुसऱ्या दिवशी 17 मे रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत बसता येईल. निसर्गानुभव कार्यक्रमासाठी मचानाचे वाटप विभागीय वन अधिकारी (Divisional Forest Officer), बोर अभयारण्य नागपूर या कार्यालयामार्फत करण्यात येईल.
या कार्यक्रमासाठी मचानवर अन्न व पाणी पुरविले जाईल. एका मचानावर फक्त 2 व्यक्तींना बसता येईल. संरक्षित क्षेत्राचे नियम सर्व सहभागींना बंधनकारक असेल. सहभागींना मचानपर्यंत वाहन नेता येणार नाही. सहभागी होणाऱ्या व्यक्तींचे कपडे निसर्गाशी समरस असावे. सहभागींना मचान निवड करता येणार नाही. बदल करता येणार नाही. मासाहार, धुम्रपान करण्यास मनाई आहे. प्रवेश घेण्यापूर्वी सर्व सहभागी व्यक्तींची तपासणी करण्यात येईल. तपासणीमध्ये काहीही आक्षेपार्ह वस्तू आढळल्यास संबंधितांची नोंदणी रद्द होईल, असे बोर अभयारण्य नागपूरचे विभागीय वन अधिकारी पी. बी. पंचभाई यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी विभागीय वन अधिकारी कार्यालय, बोर अभयारण्य, नागपूर यांच्याशी संपर्क साधावा.
बुलडाणा जिल्ह्यातील एकूण चार तालुक्यांत पसरलेला ज्ञानगंगा अभयारण्यात प्राणी आणि पक्षांसाठी पूरक वातावरण असल्याने अभयारण्यात विविध जाती प्रजातीचे पक्षी आणि प्राणी वास्तव्यास आहेत. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा, म्हणून मचानावर बसून प्राणी गणना केली जाते. यावर्षी प्राणी गणनेसाठी ज्ञानगंगा अभयारण्यात 43 मचानी उपलब्ध आहेत. येत्या 16 मेला बुद्ध पौर्णिमेच्या रात्री लखलखत्या चंद्र प्रकाशात वन्य प्राण्यांची गणना होणार आहे. या निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडून करण्यात आली होती. बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात उपलब्ध 43 मचान 100 टक्के ऑनलाईन बुक झाले आहेत. मागील 2 वर्षापासून कोरोना महामारीमुळे पर्यटकांना याचा आनंद घेता आला नाही. परंतु या वर्षी पर्यटक जंगलात जाऊन मनसोक्त आनंद घेणार आहेत, अशी माहिती बुलडाण्याचे आरएफओ चेतन राठोड यांनी दिली.